सावरगावात चोरट्यांचा धुमाकूळ! एका रात्रीत सहा ठिकाणी घरफोड्या; खरीप हंगामासाठी साठवलेले लाखो रुपये लंपास

Spread the love

जामखेड : जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एका रात्रीत तब्बल सहा ठिकाणी घरफोड्या व चोरीचे प्रयत्न केल्याने गाव हादरून गेले आहे. रात्री १ ते ३ वाजण्याच्या सुमारास ४ ते ५ जणांच्या टोळीने ही मालिका राबवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असून खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सर्वाधिक नुकसान विश्वनाथ किसन सपकाळ यांच्या कुटुंबाचे झाले. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटातील एक तोळे सोन्याचे दागिने आणि तब्बल १ लाख २० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. ही रक्कम खरीप हंगामासाठी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी तसेच घरातील जागरण-गोंधळ कार्यक्रमासाठी जमा करून ठेवली होती. चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर सपकाळ कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून हंगामाच्या तोंडावर आर्थिक संकट ओढवले आहे.

याच रात्री संदीप चिंचकर यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. येथून ५ ग्रॅम सोन्याचे दागिने व १५ हजार रुपये रोख रक्कम असा मौल्यवान ऐवज चोरून नेण्यात आला. दोन्ही घरांतील चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, कांताबाई आण्णा भांबे आणि शिवाजी आश्रु समुद्र यांच्या घरांचे दाराचे कोंडे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. याशिवाय गावातील आणखी दोन ठिकाणी संशयास्पद हालचाली व चोरीचे प्रयत्न झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

गुरुवारी सकाळी चोरीची माहिती समोर येताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. माहिती मिळताच जामखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक, ठसे तज्ज्ञ आणि गुन्हे अन्वेषण पथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे. चोरट्यांनी गावाची पूर्वरेकी करूनच चोरीचा डाव आखल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

एका रात्रीत सहा ठिकाणी चोरी व चोरीचे प्रयत्न झाल्याने ग्रामस्थांनी पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “गावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोरी होत असताना पोलिसांची गस्त नेमकी कुठे होती?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः खरीप हंगामाच्या तयारीसाठी साठवलेली रक्कम चोरीला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

घटनेच्या पार्श्वभूमीवर सावरगावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी तातडीची बैठक घेत गावात स्वयंसेवी रात्रगस्त सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. युवकांच्या स्वतंत्र पथकांमार्फत गावातील प्रमुख रस्ते आणि वस्ती भागांवर लक्ष ठेवले जाणार आहे.

दरम्यान, जामखेड पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून संशयित व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास तात्काळ ११२ क्रमांकावर किंवा जामखेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. तसेच मोठी रोख रक्कम व मौल्यवान वस्तू घरात न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: