जामखेड : जामखेड शहरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात खर्डा पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच वेळी पाच ठिकाणी छापे टाकून मोठा मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत ४१ हजार ४७० रुपयांचा देशी-विदेशी दारूचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पाच जणांविरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जामखेड शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना गुप्त बातमीदारामार्फत जामखेड शहरातील विविध हॉटेल आणि परिसरात अवैधरित्या दारूविक्री सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत त्यांनी खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि उज्वलसिंह राजपुत यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार सपोनि राजपुत यांनी विशेष पथक तयार करून जामखेड शहरात नियोजनबद्ध छापेमारी मोहीम राबवली. पोलिसांनी खर्डा रोड आणि नगर रोड परिसरातील हॉटेल सागर, हॉटेल तांबे, हॉटेल साई, हॉटेल साहेबा आणि हॉटेल पाटीलवाडा येथे छापे टाकले. छाप्यादरम्यान संबंधित ठिकाणी अवैधरित्या देशी-विदेशी मद्याची विक्री सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी सागर पांडुरंग नेटके, ज्ञानेश्वर रंजित तांबे, राजेंद्र रामभाऊ देवकाते, सचिन विक्रम तनपुरे आणि उमेश विनोद मुळे यांच्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबुर्गे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस अंमलदार शशी म्हस्के, पंडित हंबर्डे, धनराज बिराजदार, अशोक बडे आणि गणेश बडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.










