अशोक पठाडे हल्लाप्रकरणी निष्पक्ष तपास व कठोर कारवाईची मागणी

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पदाधिकारी व ग्रामस्थांचे तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना निवेदन

जामखेड : राजेवाडी येथील विवाह सोहळ्यात जवळा ग्रामपंचायत सदस्य अशोक पठाडे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा निष्पक्ष, सखोल तपास करून संबंधित आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) जामखेड तालुका पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात मंगळावर दि, १४ रोजी जामखेडचे तहसीलदार धनंजय बांगर आणि जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देण्यात आले.

शनिवार दि, ११ रोजी राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात विवाह समारंभादरम्यान सूत्रसंचालन करत असलेल्या ग्रामपंचायत सदस्य अशोक रामचंद्र पठाडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पठाडे यांच्या फिर्यादीवरून जवळा येथील रहिवासी तथा श्रीगोंदा तालुक्यात कार्यरत तलाठी शिवाजी सखाराम हजारे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 118(1), 351(2) व 352 अन्वये जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासात कोणत्याही प्रकारचा राजकीय, सामाजिक अथवा प्रशासकीय दबाव येऊ न देता निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, फिर्यादी, साक्षीदार व उपलब्ध पुराव्यांचा सखोल विचार करून कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी, तसेच पुरावे उपलब्ध असल्यास न्यायालयात सक्षम आरोपपत्र दाखल करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात फिर्यादी व साक्षीदारांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याची मागणीही करण्यात आली असून, आरोपी सरकारी सेवेत असल्याने पदाचा गैरवापर करून फिर्यादी अथवा साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कायद्याचे राज्य अबाधित राहावे आणि सर्वांना समान न्याय मिळावा, या उद्देशाने हे निवेदन देण्यात आल्याचे निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, ज्येष्ठ नेते संजय कोठारी, नगरसेवक वसीम शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, माजी सरपंच संतोष पवार, काकासाहेब कोल्हे, ज्ञानदेव ढवळे, चिराग आजबे, संदीप काढणे, संजय आव्हाड, प्रदीप धुमाळ, अमर चाऊस, किरण कोल्हे, अक्षय सुर्वे, राजू धुमाळ, हनुमंत मोहळकर, सागर शिंदे, अविराज शिरसाठ, सागर गंभीरे, श्रीकृष्ण गाडे, सुभाष धोत्रे, पप्पू मते, अविनाश पठाडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

error: