जामखेडमध्ये बनावट दुधाचा महापूर? आधी पावडरच्या गोण्या… आता संशयित दुधाची विल्हेवाट; व्हिडिओने उडवली खळबळ

Spread the love

दिघोळ-जातेगाव परिसरात संशयित पावडरनंतर नवा प्रकार, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी

जामखेड : जामखेड तालुक्यात बनावट दुधाच्या संशयित रॅकेटची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खर्डा–जातेगाव मार्गावरील तेलंगशी फाट्याजवळील एका शेतात कारवाईच्या भीतीने मोठ्या प्रमाणात दूधासारखा पांढरा द्रव फेकून दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. हा द्रव बनावट दूध असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याबाबत तातडीने वैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी होत आहे.

काही दिवसांपूर्वीच दिघोळ व जातेगाव शिवारात बनावट दूध तयार करण्यासाठी वापरल्या जात असल्याचा संशय असलेल्या रासायनिक पावडरच्या अनेक गोण्या आढळून आल्या होत्या. त्या घटनेची चर्चा सुरू असतानाच आता मोठ्या प्रमाणात संशयित पांढऱ्या द्रवाची विल्हेवाट लावण्यात आल्याचे समोर आल्याने या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पांढरा द्रव टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. हा द्रव नेमका दूध आहे की अन्य कोणता पदार्थ, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, संबंधित ठिकाणाहून नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

बनावट दूध किंवा भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी असा प्रकार गंभीर ठरू शकतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, जामखेड तालुक्यात यापूर्वीही बनावट दूध व त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता समोर आलेल्या या दोन संशयास्पद घटनांमुळे बनावट दूध रॅकेटबाबत पुन्हा एकदा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन (एफडीए), दुग्ध विकास विभाग आणि स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित पांढऱ्या द्रवाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत. तसेच बनावट दूध तयार करून त्याची विल्हेवाट लावणारे कोणते रॅकेट कार्यरत आहे का, याचाही सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आधी पावडरच्या गोण्या… आता संशयित दुधाची विल्हेवाट

दिघोळ व जातेगाव शिवारात काही दिवसांपूर्वी बनावट दूध तयार करण्यासाठी वापरल्या जात असल्याचा संशय असलेल्या रासायनिक पावडरच्या गोण्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर आता खर्डा–जातेगाव मार्गावरील तेलंगशी फाट्याजवळ शेतात मोठ्या प्रमाणात दूधासारखा पांढरा द्रव फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या सलग घटनांमुळे जामखेड तालुक्यात बनावट दूध रॅकेट कार्यरत असल्याचा संशय अधिक बळावला असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Leave a Comment

error: