कलाकेंद्र चालकांचा प्रशासनाला अल्टिमेटम; सचिन आजबे यांच्या उपोषणाची चौकशी करा, अन्यथा आम्हीही उपोषणाला बसणार!

Spread the love

जामखेड : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सचिन दत्तात्रय आजबे यांच्या उपोषणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच त्यांनी प्रत्यक्षात अन्नत्याग केला आहे की नाही याची पडताळणी करून उपोषणाच्या कालावधीतील आरोग्य अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी जामखेड शहर व परिसरातील कलाकेंद्र मालक व कलाकारांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार आणि जामखेड पोलीस स्टेशनला देण्यात आले असून, मागण्यांची दखल न घेतल्यास येत्या आठ दिवसांत कलाकेंद्र मालक व कलाकारही उपोषणास बसतील, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जामखेड व परिसरातील सर्व कलाकेंद्रे शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करून कायदेशीर परवानग्यांच्या आधारे चालविली जात आहेत. या व्यवसायावर सुमारे १२०० ते १३०० कलाकारांचा उदरनिर्वाह अवलंबून असून त्यांच्या कुटुंबातील ५ ते ६ हजार नागरिकांचे जीवनमान या व्यवसायाशी निगडित आहे. यामध्ये वयोवृद्ध, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच विविध शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींचाही समावेश असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कलाकेंद्र मालक व कलाकार हे प्रामुख्याने भटके विमुक्त कोल्हाटी समाजातील असून हा त्यांचा पिढ्यानपिढ्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यामुळे या व्यवसायावर होणाऱ्या कोणत्याही परिणामामुळे हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निवेदनात सचिन आजबे यांच्यावर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. आजबे हे गेल्या चार वर्षांपासून कलाकेंद्र चालकांकडे पैशांची मागणी करत असून मागणी पूर्ण न झाल्यास तक्रारी, निवेदने आणि उपोषणाच्या माध्यमातून कलाकेंद्र चालक व कलाकारांची बदनामी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे.

जामखेडमधील सर्व कलाकेंद्रे शासनाच्या नियमांचे पालन करत असून कोणत्याही नियमांचे उल्लंघन करत नसल्याने सुरू असलेले उपोषण हे शासनाची दिशाभूल करणारे असल्याचा आरोप कलाकेंद्र मालकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, सचिन आजबे यांच्या उपोषणामुळे शहरातील सामाजिक वातावरण बिघडत असून विविध समाजघटकांमध्ये तेढ निर्माण होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे निवेदन कलाकेंद्र मालकीण अलका हौसवराव जाधव, मंदा हिरामण चंदन, भामाबाई किसन जाधव, लता शालन जाधव, संजीवनी रामभाऊ जाधव, मंगल पोपट जाधव, राजश्री धोंडाबाई जाधव, ज्योती मोतनाबाई पवार आणि अंबिका नाजुकबाई अंधारे यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.

Leave a Comment

error: