जिल्हा नियोजन समितीवर जामखेडचा ठसा; अजय काशीद सदस्य, संध्या सोनवणे विशेष निमंत्रित

Spread the love

राज्य सरकारचा आदेश जारी; विकास नियोजनात दोघांनाही महत्त्वाची जबाबदारी

जामखेड : राज्य सरकारच्या नियोजन विभागाने जिल्हा नियोजन समितीवरील सदस्य तसेच विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सारोळा (ता. जामखेड) येथील माजी सरपंच अजय काशीद यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)च्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी (दि. ६) याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला. या नियुक्त्यांमुळे जिल्ह्याच्या विकास नियोजन प्रक्रियेत दोघांनाही महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळणार असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रात या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

अजय काशीद यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाजप संघटनेत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे चिटणीस, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तसेच सलग सहा वर्षे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी संघटन विस्तारासाठी उल्लेखनीय काम केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांच्या अनुभवाचाही त्यांना लाभ झाला असून, सारोळा ग्रामपंचायतीचे सलग दहा वर्षे बिनविरोध सरपंच म्हणून त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली.

त्यांच्या कार्यकाळात गावात अंतर्गत रस्ते, भूमिगत गटारे, जलसंधारणाची कामे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, सार्वजनिक विकासकामे आणि शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात सारोळा येथील जिल्हा परिषद शाळेने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच कै. विष्णूवस्ताद (बाबा) काशीद यांच्या स्मरणार्थ नागेश्वर यात्रेनिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या आयोजनात त्यांनी पुढाकार घेत ग्रामीण भागातील क्रीडा परंपरेलाही चालना दिली आहे.

संध्या सोनवणे या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)च्या युवती प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर सक्रिय आहेत. महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, युवक-युवतींचे प्रश्न, सामाजिक न्याय, महिला हक्क तसेच लोकहिताच्या विविध विषयांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. संघटनात्मक बांधणीसह महिलांना राजकीय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची, संघटन कौशल्याची आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाची दखल घेत राज्य सरकारने त्यांची जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती केली आहे.

जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्यातील विकास आराखड्याला अंतिम स्वरूप देणारी आणि विविध विभागांच्या योजनांना प्राधान्यक्रम निश्चित करणारी महत्त्वाची यंत्रणा मानली जाते. ग्रामीण व शहरी भागातील विकासकामे, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, सिंचन, रस्ते, पाणीपुरवठा तसेच इतर विकास योजनांसाठी निधीचे नियोजन करण्यामध्ये या समितीची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे या समितीवरील नियुक्तींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

अजय काशीद आणि संध्या सोनवणे यांच्या नियुक्तीमुळे जामखेड तालुक्याच्या विकास प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दोन्ही नेत्यांवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)च्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Comment

error: