९.७९ लाखांचा मुद्देमाल ताब्यात; चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी दुकान मालकावर गुन्हा
जामखेड : शहरातील तपनेश्वर रोड परिसरातील स्टील व भांडे विक्रीच्या दुकानावर जामखेड पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ३९ गोण्यांमध्ये भरून ठेवलेल्या तब्बल १ हजार ६३५ किलो वजनाच्या तांब्याच्या लहान-मोठ्या तारा जप्त केल्या. सुमारे ९ लाख ७९ हजार २०० रुपये किमतीचा हा मुद्देमाल चोरीचा असल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी तो जप्त करून दुकान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील तपनेश्वर रोडवरील ‘साई समर्थ स्टील व भांडे’ या दुकानात शेतीपयोगी तांब्याच्या तारा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजित मोरे व त्यांच्या पथकाने गुरुवारी (दि. १६) रात्री साडेआठच्या सुमारास दुकानावर छापा टाकला.
छाप्यादरम्यान दुकानात ठेवलेल्या ३९ गोण्यांची तपासणी केली असता त्यामध्ये विविध आकारांच्या तांब्याच्या तारा आढळून आल्या. या तारांचे एकूण वजन १ हजार ६३५ किलो असून त्यांची किंमत ९ लाख ७९ हजार २०० रुपये असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत दुकान मालक महेश मोहनलाल भंडारी (वय ४८) यांच्याकडे तांब्याच्या तारांबाबत कागदपत्रे व खरेदीची माहिती मागविण्यात आली. मात्र, त्यांनी समाधानकारक माहिती अथवा आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत. तसेच उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संबंधित तांब्याच्या तारा चोरीच्या असल्याचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून महेश भंडारी यांच्याविरुद्ध चोरीचा माल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातील तांब्याच्या तारा नेमक्या कुठून आणण्यात आल्या, त्या कोणत्या चोरीच्या गुन्ह्याशी संबंधित आहेत का, तसेच यामागे एखादे रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास जामखेड पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध भंगार व तांब्याच्या खरेदी-विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.










