जामखेडमध्ये खळबळ; वनक्षेत्रात आढळल्या दुग्धजन्य पावडरच्या बेवारस गोण्या

Spread the love

भेसळविरोधी कारवाईच्या धास्तीने वनक्षेत्रात साठा टाकल्याची चर्चा, तपासानंतरच उलगडणार साठ्यामागील रहस्य

जामखेड : जामखेड तालुक्यातील दिघोळ-तेलंगशी रस्त्यालगत वन विभागाच्या हद्दीत दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरसदृश पदार्थाच्या सुमारे ५० ते ६० गोण्या अज्ञात व्यक्तींनी बेवारस अवस्थेत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे जामखेड तालुक्यात खळबळ उडाली असून, संबंधित पदार्थ नेमका कोणता आहे, तो येथे कोणी व कोणत्या उद्देशाने टाकला, याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

दि. २६ जून रोजी सकाळी परिसरातील एका शेतकऱ्याच्या निदर्शनास वन विभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणात गोण्या पडल्याचे आले. त्यांनी याची माहिती दिघोळचे सरपंच दशरथ राजगुरू यांना दिली. त्यानंतर सरपंच राजगुरू यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता पावडरसदृश पदार्थाने भरलेल्या सुमारे ५० ते ६० गोण्या आढळून आल्या. हा साठा रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी वाहनातून येथे आणून टाकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच सरपंच दशरथ राजगुरू यांनी खर्डा पोलीस ठाणे व वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सुरू असून संबंधित पदार्थाचे स्वरूप तपासले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दिघोळ, तेलंगशी, खर्डा, माळवाडी, जायभायवाडी, मोहरी व जातेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात दूध संकलन केंद्रे कार्यरत आहेत. त्यामुळे या साठ्याचा दुग्ध व्यवसायाशी काही संबंध आहे का, याबाबत परिसरात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.

गोण्यांमध्ये नेमका कोणता पदार्थ आहे, तो निकृष्ट दर्जाचा किंवा भेसळयुक्त आहे का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित पदार्थाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच कोणत्याही शेतकरी किंवा पशुपालकाने या पावडरचा वापर जनावरांच्या खाद्यासाठी अथवा इतर कोणत्याही कारणासाठी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या हा साठा वन विभागाच्या हद्दीतच पडून असल्याने पर्यावरण, वन्यजीव तसेच जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने साठ्याची सुरक्षित विल्हेवाट लावून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नभेसळीविरोधात धडक मोहीम सुरू असून, त्याच्या पार्श्वभूमीवर हा साठा येथे टाकून देण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. मात्र, या चर्चेला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नसून तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

error: