जामखेडच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी २६.८४ कोटींची तरतूद – प्रा. राम शिंदे

Spread the love

३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन; कर्मचारी निवासस्थानासह चार मजली इमारत उभारणार

जामखेड : तालुक्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, जामखेड येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या इमारतीसह कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने पुरवणी मागण्यांमधून तब्बल २६ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये या निधीचा समावेश करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयासाठी निधी मंजूर व्हावा यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आर्थिक मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

मंजूर निधीतून उभारण्यात येणारे उपजिल्हा रुग्णालय तळमजला अधिक तीन मजले अशा चार मजली स्वरूपाचे असणार आहे. रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, वाढीव खाटांची व्यवस्था, विविध उपचार विभाग तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासस्थानाची सोय करण्यात येणार आहे.

जामखेडसह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारांसाठी अहमदनगर, पुणे किंवा अन्य शहरांमध्ये जावे लागत होते. मात्र उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून अनेक आरोग्य सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार असल्याने रुग्णांची गैरसोय कमी होणार आहे. विशेषतः आपत्कालीन आरोग्य सेवा, माता-बाल संगोपन सेवा आणि विविध तज्ज्ञ उपचार सुविधांचा लाभ तालुक्यातील नागरिकांना मिळणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने जामखेडच्या आरोग्य विकासासाठी घेतलेल्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला नवे बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: