रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा आणखी एक बळी; पिकअपच्या धडकेत जामखेडच्या तरुणाचा मृत्यू

Spread the love

बीड रोडवरील मुंढे हॉस्पिटलसमोर पिकअपची मोटारसायकलला धडक

जामखेड : जामखेड शहरातून जाणाऱ्या रखडलेल्या जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (ता. २७) रात्री झालेल्या भीषण अपघातात सिद्धेश्वर गणेश म्हेत्रे (वय ३२, रा. मुंजोबा गल्ली, जामखेड) या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बीड रोडवरील मुंढे हॉस्पिटलसमोर मोटारसायकलवर रस्त्याच्या कडेला उभे असताना भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेने जामखेड शहरात शोककळा पसरली असून, रखडलेल्या महामार्गाच्या कामाबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर म्हेत्रे हे बीड रोडवरील मुंढे हॉस्पिटलसमोर आपल्या मोटारसायकलवर रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ते गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

अपघाताची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेण्यात आले असून, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या अपघातानंतर जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक वर्षांपासून महामार्गाचे काम संथगतीने सुरू असून, शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. रस्त्यालगत वाढलेली अतिक्रमणे, अपुरा प्रकाश, वाहतूक नियोजनाचा अभाव आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

यापूर्वीही या मार्गावर अनेक जीवघेणे अपघात घडले असून, अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकजण गंभीर जखमी होऊन कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे गेले आहेत. तरीही संबंधित विभाग, कंत्राटदार आणि प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सिद्धेश्वर म्हेत्रे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तरी प्रशासन, संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करावे, शहरातील अतिक्रमणे हटवून वाहतुकीचे नियोजन सुधारावे आणि अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षाव्यवस्था उभारावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: