भांडण सोडविण्यास गेलेल्या कुटुंबीयांवरच हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिला जखमी, दोघांविरुद्ध गुन्हा
जामखेड : घराबाहेर सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांवर वस्ताऱ्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरातील कुंभारतळ परिसरात १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सात जण जखमी झाले असून, एका महिलेच्या गळ्याच्या उजव्या बाजूस वस्ताऱ्याने वार करण्यात आल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी अनिकेत दीपक चव्हाण व माया दीपक चव्हाण (दोघे रा. कुंभारतळ, जामखेड) यांच्याविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवीदास लक्ष्मण फुलमाळी (वय ३२, रा. मूळ गोरोबाटाकी, कुंभारतळ, जामखेड; सध्या रा. वडघर, ता. पनवेल, जि. रायगड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फुलमाळी कुटुंब धार्मिक विधी व नागपंचमी यात्रेनिमित्त ३ ऑगस्टपासून जामखेड येथे आले होते. कुटुंबातील इतर नातेवाईकही पनवेल येथून जामखेडला आले होते.
आरडाओरड ऐकून घराबाहेर आले अन्…
१८ ऑगस्ट रोजी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास देवीदास फुलमाळी हे घरी असताना घराबाहेर आरडाओरड व गोंधळाचा आवाज ऐकू आला. त्यामुळे ते बाहेर आले असता त्यांची मेहुणी सुषमा रामा फुलमाळी व सासू मालन रामा फुलमाळी यांचा अनिकेत चव्हाण याच्यासोबत वाद सुरू असल्याचे दिसले.
देवीदास यांनी भांडण कशामुळे सुरू आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर भांडण सोडविण्यासाठी किरण गोटीराम फुलमाळी, राहुल रामा फुलमाळी, रामा बजरंग फुलमाळी व मुसलाबाई गोटीराम फुलमाळी हेही पुढे गेले. याचवेळी अनिकेत चव्हाण याने हातातील वस्ताऱ्याने हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
गळ्यावर वार; सात जणांना दुखापत
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, अनिकेत चव्हाण याने सुषमा फुलमाळी यांच्या गळ्याच्या उजव्या बाजूस वस्ताऱ्याने वार करून त्यांना जखमी केले. मालन फुलमाळी यांच्या उजव्या हाताच्या दंडावर व कांबीवर मारहाण करण्यात आली. देवीदास यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस मारण्यात आले.
किरण फुलमाळी यांच्या डाव्या कांबीवर व गालावर, तर राहुल फुलमाळी यांच्या डाव्या हाताच्या कांबीपासून करंगळीच्या बाजूने मनगटापर्यंत तसेच उजव्या हाताच्या दंडावर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राहुल यांना गंभीर दुखापत झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. रामा बजरंग फुलमाळी यांच्या कपाळाच्या डाव्या बाजूस मारहाण करण्यात आली.
मुसलाबाई फुलमाळी यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर वस्ताऱ्याने वार करून मोठी दुखापत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शिवीगाळ व दमदाटीचाही आरोप
हल्ल्यादरम्यान माया दीपक चव्हाण हिने शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. घटनेनंतर जखमींना पोलिसांनी उपचारासाठी वैद्यकीय मेमो दिला. त्यानंतर सर्व जखमींवर जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर देवीदास फुलमाळी यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
दोघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा
या प्रकरणी अनिकेत दीपक चव्हाण व माया दीपक चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण, वादाची सुरुवात कशामुळे झाली आणि हल्ल्यात वापरण्यात आलेल्या वस्ताऱ्याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार संजय दत्तू लोखंडे करीत आहेत.








