नान्नज परिसरातील बऱ्हाणपूरजवळ श्रीरामपूरच्या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण; महिलेच्या तीन साथीदारांसह चौघांविरुद्ध गुन्हा
जामखेड : वडील आजारी आहेत, त्यांच्या उपचारासाठी जमीन विकायची आहे, असे सांगून श्रीरामपूर येथील दोघांना जमीन पाहण्यासाठी नान्नज परिसरातील बऱ्हाणपूरजवळ बोलावण्यात आले. निर्जन शेतात नेल्यानंतर एका महिलेने तिच्या तीन साथीदारांच्या मदतीने दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, दागिने व मोबाइल असा ३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटल्याची खळबळजनक घटना २३ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत श्रीरामपूर येथील कलिम अवद बिनसाद (वय ४३) यांनी २४ ऑगस्ट रोजी रात्री जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बिनसाद हे श्रीरामपूर शहरात बॅग शॉपी चालवतात. त्याचबरोबर ‘महारक्षक सिक्युरिटी फोर्स प्रा. लि.’ तसेच ‘ग्लोबल करिअर अकॅडमी’च्या माध्यमातून सुरक्षा सेवा आणि भरतीपूर्व प्रशिक्षणाचे काम करतात.
ओळखीच्या महिलेचा फोन; जमीन विक्रीची बतावणी
फिर्यादीनुसार, त्यांच्या सिक्युरिटी फोर्समध्ये मागील सुमारे वर्षभरापासून हिना शबीर शिंदे (रा. टोलनाक्याजवळ, पाटोदा, जि. बीड) ही काम करत होती. त्यामुळे तिची बिनसाद यांच्याशी ओळख होती. १९ ऑगस्ट रोजी हिनाने बिनसाद यांचे पार्टनर ज्ञानेश्वर महादेव घायतडक यांना फोन केला. वडील आजारी असून त्यांच्या उपचारासाठी जमीन विकायची असल्याचे तिने सांगितले. जमीन पाहून पसंत पडल्यास व्यवहार करण्याचे सांगत इसारासाठी काही रक्कम घेऊन येण्यासही सांगितले.
त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी हिनाने पुन्हा घायतडक यांना फोन करून जामखेडला जमीन पाहण्यासाठी येण्यास सांगितले. ओळखीच्या व्यक्तीने जमीन दाखवण्यास बोलावल्याने बिनसाद व घायतडक हे आय-२० कारमधून जामखेडला आले.
खर्डा रोडवरून बऱ्हाणपूरच्या दिशेने नेले
जामखेडला आल्यानंतर हिनाशी फोनवर संपर्क साधला असता तिने खर्डा रोडवरील लोकेशन पाठवून तेथे बोलावून घेतले. बिनसाद व घायतडक तेथे पोहोचले असता हिनासोबत एक पुरुष व्यक्ती होती. त्याने दोघांना मोटारसायकलच्या मागे कारने येण्यास सांगितले.
त्यानुसार दोघे नान्नज व चोभेवाडीमार्गे बऱ्हाणपूरच्या पुढील रस्त्याने संबंधित मोटारसायकलच्या मागे गेले. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास हिनाने बऱ्हाणपूर परिसरातील आंब्याचे शेत दाखवले. कार रस्त्यालगत उभी करून दोघे शेतात गेले.
शेतात पोहोचताच चौघांनी घातला घेराव
शेतात दोघे पोहोचताच हिना शिंदेसह तिच्या तीन साथीदारांनी त्यांना पकडले. त्यानंतर चौघांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीनंतर बिनसाद यांच्याकडे असलेली ३ लाख १० हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आली.
याशिवाय बिनसाद यांच्या अंगावरील चांदीच्या दोन अंगठ्या, घड्याळ आणि मोबाइल काढून घेण्यात आला. त्यांचे मित्र ज्ञानेश्वर घायतडक यांच्या खिशातील ३० हजार रुपये रोख आणि विवो कंपनीचा मोबाइलही आरोपींनी काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
“थांबलात तर जीव मारू” अशी धमकी
रोख रक्कम, दागिने, घड्याळ व मोबाइल असा एकूण ३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेतल्यानंतर आरोपींनी दोघांना घटनास्थळी थांबू नका, अन्यथा जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर चौघेही तेथून निघून गेले.
घटनेनंतर बिनसाद व घायतडक हे कारमधून जामखेडला परतले. त्यांनी पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. बिनसाद यांनी २४ ऑगस्ट रोजी रात्री दिलेल्या फिर्यादीनुसार हिना शबीर शिंदे व तिच्या तीन साथीदारांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे पुढील तपास करीत आहेत.








