‘मी जात पंचायतचा पंच’ म्हणत पाच लाखांची मागणी; नकार देताच कुटुंबाला मारहाण

Spread the love

जामखेडमधील धक्कादायक प्रकार; लोखंडी गज, दगड-कापडाने मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जामखेड: ‘मी जात पंचायतचा पंच आहे. तुमच्या मुलीच्या लग्नाचे पाच लाख रुपये दिलेले नाहीत. ते तुला द्यावे लागतील,’ अशी मागणी करत एका कुटुंबाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरातील आरोळे वस्ती येथे घडली आहे. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेत पती-पत्नी, पुतण्या आणि भावजई यांना मारहाण झाल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी सहा जणांविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबू तात्या शिंदे (वय ४९, रा. आरोळे वस्ती, जामखेड) यांनी सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे उपचार घेत असताना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस जबाबानुसार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास बाबू शिंदे हे आपल्या कुटुंबीयांसह घरासमोर असताना वसंत तात्या लोखंडे, किरण वसंत लोखंडे, अक्षय वसंत लोखंडे, बाजीराव यल्लाप्पा लोखंडे, विलास यल्लाप्पा लोखंडे व सुनिता लक्ष्मण दासरजोगे हे तेथे आले.

यावेळी वसंत लोखंडे याने आपण जात पंचायतचा पंच असल्याचे सांगून, ‘तुमच्या मुलीच्या लग्नाचे पाच लाख रुपये दिलेले नाहीत. ते तुला द्यावे लागतील,’ अशी मागणी केली. तसेच आपला शब्द कोणी मोडत नाही आणि कोणी नादी लागत नाही, असे म्हणत पैशांची मागणी केल्याचे तक्रारदाराने जबाबात नमूद केले आहे.

मात्र, आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची असून आपल्याकडे पैसे नसल्याचे बाबू शिंदे यांनी सांगितल्यानंतर वादाला सुरुवात झाल्याचा आरोप आहे. वाद सुरू असताना किरण वसंत लोखंडे याने हातातील लोखंडी गजाने बाबू शिंदे यांच्या पुतण्या सागर बप्पू शिंदे यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे सागर शिंदे जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर बाजीराव यल्लाप्पा लोखंडे याने कापडात दगड बांधून बाबू शिंदे यांच्या पाठीवर व पोटावर मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच वसंत लोखंडे, अक्षय लोखंडे आणि विलास लोखंडे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेत बाबू शिंदे यांची पत्नी शांताबाई शिंदे आणि भावजई बेबी शिंदे यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याचा आरोप आहे.

मारहाणीचा प्रकार सुरू असताना वस्तीवरील नागरिक घटनास्थळी जमा झाल्याचे बाबू शिंदे यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर संबंधितांनी शिवीगाळ करत कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, झालेल्या झटापटीमध्ये शांताबाई शिंदे यांच्या गळ्यातील व कानातील दागिने पडून गहाळ झाल्याचेही पोलिस जबाबात नमूद करण्यात आले आहे.

मारहाणीनंतर बाबू शिंदे यांच्यावर अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार घेत असताना त्यांनी पूर्ण शुद्धीत असल्याचे नमूद करून पोलिसांना जबाब दिला. त्यानुसार जामखेड पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसंत तात्या लोखंडे, किरण वसंत लोखंडे, अक्षय वसंत लोखंडे, बाजीराव यल्लाप्पा लोखंडे, विलास यल्लाप्पा लोखंडे आणि सुनिता लक्ष्मण दासरजोगे अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 115(2), 118(1), 189(2), 190, 191(2), 191(3), 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार संजय दत्तू लोखंडे करीत आहेत.

Leave a Comment