खर्ड्यात भटके-विमुक्त संशोधन संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांचा अनोखा उपक्रम; सामाजिक बांधिलकीसह पर्यावरण संवर्धनाचा संदेश
जामखेड: रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ग्रामीण विकास केंद्र भटके-विमुक्त संशोधन संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. खर्डा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन महिला कार्यकर्त्यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
सामाजिक कार्याच्या विविध उपक्रमांना खर्डा पोलीस स्टेशनकडून नेहमीच सहकार्य मिळते. या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिलांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधली. पोलिसांकडून समाजाच्या सुरक्षिततेसाठी सुरू असलेल्या कार्याबद्दल यावेळी महिलांनी आभार व्यक्त केले.

तसेच सामाजिक उपक्रमांना सहकार्य करणारे पत्रकार आणि ग्रामपंचायत सदस्य यांनाही महिलांनी राखी बांधून शुभेच्छा दिल्या. रक्षाबंधनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांमध्ये आपुलकी, विश्वास आणि सहकार्याची भावना निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
ओवाळणीऐवजी झाडाची भेट
दरम्यान, या उपक्रमातील विशेष बाब म्हणजे महिलांसाठी करण्यात आलेली ओवाळणी. महालिंग कोरे, विशाल पवार, संभाजी शेंडे आणि धनसिंग साळुंके यांनी पारंपरिक भेटवस्तू देण्याऐवजी महिलांना झाड भेट दिले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने झाड देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असून, सण-उत्सवांच्या माध्यमातूनही पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवता येतो, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. झाडाची भेट देण्याच्या या अनोख्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
सामाजिक एकोप्याचा धागा
महिला कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस, पत्रकार, ग्रामपंचायत सदस्य आणि समाजातील विविध घटकांशी आपुलकीचे नाते जोडले. त्यामुळे पारंपरिक सणाला सामाजिक कार्याची जोड मिळाली. राखीच्या धाग्यासोबतच सामाजिक एकोपा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम खर्ड्यात चर्चेचा विषय ठरला.
यावेळी मंगल शिंगाणे, नीता इंगळे, उर्मिला कवडे, लखुपती गोलेकर आणि सुवर्णा पवार या महिला उपस्थित होत्या.








