जातेगाव ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यावर कारवाई; १० हजारांची मागणी, ५ हजार स्वीकारताना रंगेहात पकडले
जामखेड : ग्रामपंचायतीच्या कामकाजाशी संबंधित माहिती देण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील ५ हजार रुपये स्वीकारताना जातेगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी महादेव मल्हारी ढाकणे (वय ५२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. मंगळवारी (दि. ११) जामखेड शहरातील हॉटेल महाभगवती परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने तालुक्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराला ग्रामपंचायत जातेगावच्या कामकाजासंदर्भात तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित काही माहिती हवी होती. त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत अधिकारी महादेव ढाकणे यांच्याशी संपर्क साधला. संबंधित माहिती देण्यासाठी ढाकणे याने १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी जामखेड येथील हॉटेल महाभगवती परिसरात सापळा रचण्यात आला.
ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने महादेव ढाकणे याला रंगेहात पकडले. उर्वरित लाचेच्या रकमेसंदर्भातही तक्रारदार व आरोपी यांच्यात संभाषण झाल्याचे एसीबीच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ढाकणे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगरच्या पोलीस निरीक्षक सविता तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले. सापळा पथकात पोलीस नाईक चंद्रकांत काळे (पोना/७०), पोलीस अंमलदार शेखर वाघ (पोको/२२६२) व चालक पोलीस हवालदार करांडे यांचा समावेश होता.








