‘जमिनीच्या व्यवहारात साक्षीदार का झाला?’ म्हणत शेतकऱ्याला बेदम मारहाण

Spread the love

कुसडगाव बसस्थानकातील घटना; तीन जणांविरुद्ध जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल

जामखेड: जमिनीच्या व्यवहारात साक्षीदार का झाला, या कारणावरून २८ वर्षीय शेतकऱ्याला शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याची घटना कुसडगाव (ता. जामखेड) येथील बसस्थानकावर २९ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर दादा काकडे (वय २८, व्यवसाय शेती, रा. कुसडगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, कुसडगाव येथील बापुराव विठ्ठल टिळेकर यांनी त्यांच्या नावावर असलेली जमीन मुलगी तुळसाबाई सावता खंदारे यांच्या नावावर केली होती. या व्यवहाराच्या वेळी सागर काकडे यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली होती.

२९ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९ वाजता सागर काकडे हे कुसडगाव बसस्थानकावर गेले होते. त्यावेळी अनिकेत अंगद टिळेकर, संकेत अंगद टिळेकर आणि अंगद भानुदास टिळेकर हे तेथे आले. ‘तू बापुराव टिळेकर यांची जमीन त्यांच्या मुलीच्या नावावर करताना साक्षीदार का झाला?’ अशी विचारणा करीत तिघांनी सागर यांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर अनिकेत टिळेकर याने बसस्थानक परिसरात पडलेली काठी उचलून सागर यांच्या डाव्या हातावर मारल्याचा आरोप आहे. तसेच संकेत टिळेकर व अंगद टिळेकर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी ‘तुला आम्ही सोडणार नाही,’ अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मारहाणीचा प्रकार सुरू असताना वैभव ज्ञानदेव कार्ले व गणेश सतीश काकडे हे तेथे आले. त्यांनी हस्तक्षेप करून सागर काकडे यांची तिघांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर सागर यांनी जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. उपचारानंतर त्यांनी जामखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी अनिकेत अंगद टिळेकर, संकेत अंगद टिळेकर आणि अंगद भानुदास टिळेकर (सर्व रा. कुसडगाव, ता. जामखेड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११५(२), ११८(१), ३५१(२) व ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सलीम नूर शेख करीत आहेत.

Leave a Comment