खर्डा किल्ल्यावर युवकांनी जपला इतिहासाचा वारसा

Spread the love

‘माझा गड, माझी जबाबदारी’तून स्वच्छता मोहीम; भगवा ध्वज फडकवून शौर्यभूमीला अभिवादन

जामखेड: शिर्डी–हैदराबाद राज्य महामार्गालगत असलेल्या ऐतिहासिक शिवपट्टण अर्थात खर्डा किल्ल्यावर पाथर्डी येथील संत वामनभाऊ तरुण मंडळाच्या वतीने ‘माझा गड, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मंडळाच्या सदस्यांनी किल्ल्यावरील प्लास्टिक, गवत व इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. त्यानंतर किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर भगवा ध्वज फडकवून ऐतिहासिक वारशाला अभिवादन करण्यात आले.

खर्डा किल्ला हा जामखेड तालुक्याच्या ऐतिहासिक वैभवाची ओळख असून मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. बालाघाटच्या डोंगररांगेत वसलेल्या या किल्ल्याची उभारणी १७४३ ते १७४५ च्या सुमारास सरदार आप्पासाहेब निंबाळकर यांनी केली. याच परिसरात ११ मार्च १७९५ रोजी मराठे आणि निजाम यांच्यात ऐतिहासिक खर्ड्याची लढाई झाली. या लढाईत निजामाचा पराभव झाला. त्यामुळे खर्ड्याच्या भूमीला मराठ्यांच्या इतिहासात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ऐतिहासिक वारशाचे जतन आवश्यक

मंडळाचे अध्यक्ष तथा शिवव्याख्याते सचिन नागापुरे यांनी सांगितले की, खर्डा किल्ला हा मराठ्यांच्या विजयाची शौर्यगाथा सांगणारा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा आहे. गड-किल्ले ही आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी ठेवा आहेत. त्यामुळे त्यांचे जतन, स्वच्छता आणि संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. याच भावनेतून ‘माझा गड, माझी जबाबदारी’ हा उपक्रम राबविण्यात आला.

स्वच्छता मोहिमेनंतर मंडळाच्या सदस्यांनी किल्ल्यावरील माती कपाळाला लावून ऐतिहासिक भूमीला नतमस्तक होत अभिवादन केले. तसेच किल्ला परिसरातील सरदार आप्पासाहेब निंबाळकर यांच्या समाधीस्थळाची (छत्री)ही स्वच्छता करण्यात आली.

३७ वर्षांपासून सामाजिक उपक्रमांची परंपरा

संत वामनभाऊ तरुण मंडळाची स्थापना १९९० मध्ये झाली असून यंदा मंडळाचे ३७ वे वर्ष आहे. मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम राबविले जात आहेत. रक्तदान व आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम, अन्नदान, श्रमदान, मतदार नोंदणी तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व बालकांसाठी विविध उपक्रमांमध्ये मंडळाचा सातत्याने सहभाग असतो.

या स्वच्छता मोहिमेत शिवव्याख्याते सचिन नागापुरे, अशोक जेधे सर, प्रवीण आव्हाड, भूषण नागापुरे, कृष्णा जेधे, सुजल गाडे, छोट्या गव्हाणे, मंगेश कोकीळ, पियुष गायकवाड, लक्ष बाफना आदी सदस्य सहभागी झाले होते.

Leave a Comment