हाळगाव कृषी महाविद्यालयासाठी पाणीपुरवठा योजनेचा २६.९१ कोटींचा प्रस्ताव सादर करा : राम शिंदे

Spread the love

जामखेड : हाळगाव (ता. जामखेड) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाला नियमित व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मांगी मध्यम प्रकल्पातून (ता. करमाळा) उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाणी आणण्याच्या २६.९१ कोटी रुपयांच्या प्रस्तावास तातडीने अंतिम स्वरूप देऊन शासनाकडे सादर करावा, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले.

मुंबई येथील विधानभवनात सभापती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाविद्यालयाच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी सचिव परिमल सिंह, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता दत्तात्रय सोनवणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महाविद्यालयातील पाणीटंचाईचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांबरोबरच संशोधन व प्रात्यक्षिक शेती प्रकल्पांवर होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मांगी मध्यम प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी महाविद्यालय परिसरातील विविध विकासकामांचाही आढावा घेण्यात आला. महाविद्यालयात विविध शेड उभारणे, पाईपलाईन टाकणे, संरक्षक कुंपण बांधणे, अंतर्गत रस्त्यांची कामे, गोदाम उभारणी, खेळाचे मैदान विकसित करणे तसेच विश्रामगृहाचे नूतनीकरण करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय सुरू होऊन आठ वर्षांचा कालावधी उलटला असला तरी काही विकासकामे आणि भूसंपादन प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे कृषी, महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागांनी परस्पर समन्वय राखून प्रलंबित कामे मार्गी लावावीत, असे निर्देश शिंदे यांनी दिले. यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी स्वीकारावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

error: