जामखेड : भारतीय जनगणना 2026-27 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेला जामखेड नगर परिषद हद्दीत शुक्रवारपासून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार असून शहरातील प्रत्येक घराची माहिती संकलित केली जाणार आहे.
या मोहिमेसाठी जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे हे चार्ज ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. जनगणना अधिकारी महेश शेकडे, अमीर शेख, महेश कवादे व अतुल राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.
घरगणना मोहिमेत ८० प्रगणक शिक्षक, १३ पर्यवेक्षक तसेच नगरपरिषद जनगणना विभागातील ३ कर्मचारी असा एकूण ९६ जणांचा सहभाग आहे. घरांची माहिती संकलित करणे, कुटुंबीयांची नोंद घेणे, नकाशे तयार करणे तसेच विविध मूलभूत माहिती गोळा करण्याचे काम या कालावधीत करण्यात येणार आहे.
प्रगणक शिक्षकांना प्रशासनाकडून आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून माहिती संकलन अचूक व पारदर्शक पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जनगणना प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी सहकार्य करून योग्य माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले, “जनगणना हे देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. शासनाच्या विविध योजना व भविष्यातील नियोजनासाठी जनगणनेतील माहिती उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रगणकांना अचूक माहिती द्यावी.”
प्रगणक शिक्षक मयूर भोसले यांनी सांगितले की, “जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असून सर्वांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्यात येईल.”
नगर परिषद प्रशासन, शिक्षक व कर्मचारी यांच्या समन्वयातून घरगणना मोहीम प्रभावीपणे राबविली जात असून नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.










