खर्ड्यात कामगारांच्या खोलीवर चोरट्यांचा डल्ला; चार मोबाईल चोरीप्रकरणी दोघांना अटक

Spread the love

जामखेड : खर्डा शहरातील बांधकाम मजुरांच्या राहत्या खोलीत घुसून चार मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आरोपींचा खर्डा पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला. घटनास्थळी सापडलेल्या एका संशयास्पद चप्पलीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत स्थानिक युवकासह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचे चारही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बाहेर राज्यातील काही कामगार हे खर्डा शहरातील कुरमुडे यांच्या शाळेच्या बांधकामाचे काम करण्यासाठी आले होते. हे कामगार खर्डा येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते. दिनांक १७ मे २०२६ रोजी दिवसभर काम करून सर्व कामगार रात्री झोपले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खोलीत प्रवेश करून चार मोबाईल फोन लंपास केले. सकाळी मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात येताच कामगारांनी खर्डा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी तत्काळ तपास पथक घटनास्थळी पाठविले. तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक संशयास्पद चप्पल आढळून आली. पोहेकॉ संभाजी शेंडे यांनी ती चप्पल ताब्यात घेत तपासाची दिशा निश्चित केली.

यानंतर पोलीस अंमलदार बाळू खाडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी खर्डा गावातील रहिवासी नाना उत्तम काळे याच्यासह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले चारही मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून परिसरातील इतर चोरीच्या घटनांबाबतही माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील तपासात आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पोहेकॉ संभाजी शेंडे, पोलीस अंमलदार बाळू खाडे, शशी म्हस्के, अशोक बडे आणि भगवान पालवे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहेकॉ संभाजी शेंडे करीत आहेत.

Leave a Comment

error: