जामखेड : तालुक्यातील रत्नापूर रोड परिसरातील एका सोलर कंपनीच्या प्लांटवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल ३ लाख रुपये किमतीची १८ हजार मीटर लांबीची सोलर वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश निवृत्ती साबळे (वय ५०, व्यवसाय इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, रा. हडपसर, ता. हवेली, जि. पुणे, सध्या रा. म्हाडा कॉलनी, जामखेड) यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दि. १२ मे २०२६ रोजी रात्री १२ वाजेपासून ते दि. १३ मे २०२६ रोजी रात्री १२ वाजेदरम्यान आयटीआय कॉलेज जामखेडकडून रत्नापूर रोडकडे जाणाऱ्या सोलर प्लांट परिसरात ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीची सोलर वायर चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चोरट्यांनी अंदाजे १८ हजार मीटर लांबीची आणि सुमारे ३ लाख रुपये किमतीची सोलर वायर लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिस स्टेशनचे पोहेकॉ संजय लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ संजय लोखंडे हे करीत आहेत.










