जामखेड : आधीच भीषण दुष्काळ, पाण्याची तीव्र टंचाई आणि शेतीतील अनिश्चिततेमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नव्या संकटाने उभे ठाकले आहे. जामखेड तालुक्यातील पांढरेवाडी येथे महावितरणच्या खांबावर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शेतकरी रावसाहेब किसन जायभाय यांचे तब्बल चार एकरांतील सोयाबीन जळून पूर्णपणे खाक झाले. शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) रोजी ही दुर्दैवी घटना घडली. मळणीसाठी काढून ठेवलेले लाखमोलाचे सोयाबीन डोळ्यांसमोर राख झाल्याने जायभाय यांच्यावर अक्षरशः आभाळ कोसळले आहे.
वर्षाभराच्या मेहनतीवर फिरले पाणी
यंदा पावसाअभावी शेतीचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करत रावसाहेब जायभाय यांनी मोठ्या कष्टाने चार एकरांत सोयाबीनचे पीक उभे केले होते. पीक हातात आल्यानंतर मळणीसाठी ते दुसऱ्याच्या शेतात काढून ठेवले होते. मात्र, शुक्रवारी अचानक लागलेल्या आगीने काही क्षणांतच या पिकाचा भस्मसात केला. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे जायभाय कुटुंबाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.
केवळ फोटो काढून अधिकारी माघारी; पांढरेवाडीत तीव्र संताप
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी आणि स्थानिक तलाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यांनी प्रत्यक्ष नुकसानीचा रीतसर पंचनामा न करता केवळ छायाचित्रे (फोटो) काढून काढता पाय घेतल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शासकीय नियमानुसार मदत मिळण्यासाठी पंचनाम्याची कागदपत्रे अत्यंत आवश्यक असतात. मात्र, अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार कारभारामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत कशी मिळणार, असा सवाल उपस्थित होत असून पांढरेवाडी परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
एकीकडे निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देणारा शेतकरी आणि दुसरीकडे प्रशासकीय दिरंगाईमुळे अडकून पडलेली मदतीची प्रक्रिया, अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा पूर्ण करावा आणि महावितरण व महसूल विभागाकडून बाधित शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.








