जामखेड : जामखेड शहरातून एक अत्यंत थरारक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. जामखेड-नगर रस्त्यावरील एका गजबजलेल्या चहाच्या हॉटेलात चहा पिण्यासाठी बसलेल्या ३४ वर्षीय तरुणावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणाऱ्या हल्ल्यात तरुणाचा एक हात मनगटापासून तुटून वेगळा झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण जामखेड शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे.
काय आहे नेमकी घटना?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल बाळू अंधारे (वय ३४, रा. जामखेड) हे नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जामखेड-नगर रस्त्यावरील एका चहाच्या हॉटेलमध्ये बसले होते. ते चहा घेत मित्रासोबत गप्पा मारत असतानाच अचानक दोन युवक धारदार हत्यारे घेऊन हॉटेलमध्ये शिरले, तर त्यांचा तिसरा साथीदार बाहेर मोटारसायकल चालू ठेवून उभा होता.
हॉटेलमध्ये घुसलेल्या हल्लेखोरांनी कोणतीही पूर्वकल्पना किंवा संधी न देता राहुल अंधारे यांच्यावर अचानक कोयत्याने वार केला. हा वार अंगावर येऊ नये म्हणून राहुल यांनी आपला हात आडवा केला, मात्र हल्लेखोरांच्या अत्यंत जोराच्या वारामुळे त्यांचा एक हात मनगटाच्या वरच्या बाजूने तुटून पूर्णपणे वेगळा झाला. या हल्ल्यामुळे हॉटेल परिसरात रक्ताचा सडा पडला आणि रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. यानंतर तिन्ही हल्लेखोर मोटारसायकलवरून घटनास्थळावरून फरार झाले.
प्रसंगावधान राखत तुटलेला हात पिशवीत नेला रुग्णालयात
या रक्ताने भारलेल्या थरारानंतर परिसरात एकच धावपळ उडाली. मात्र, उपस्थित काही धाडसी नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत गंभीर जखमी राहुल अंधारे यांचा तुटलेला हात गोळा करून कागदी पिशवीत ठेवला आणि त्यांना तातडीने जामखेड शहरातील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
पोलिसांची तत्परता; सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
हॉटेल चालक बंडू ढवळे यांनी या घटनेची माहिती त्वरित पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना दिली. माहिती मिळताच जामखेड पोलीस ठाण्याचे पथक क्षणात घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.
प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्य किंवा जुन्या वादातून झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची वेगवेगळी पथके हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी कामाला लागली आहेत. जामखेडसारख्या गजबजलेल्या आणि भागात घडलेल्या या भयानक हल्ल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांकडून या फरार हल्लेखोरांना कधी जेरबंद केले जाते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.








