जामखेडमध्ये मध्यरात्री गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ६.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, खर्डा पोलिसांची धडक कारवाई: एकावर गुन्हा दाखल

Spread the love

जामखेड : खर्डा पोलिसांनी मध्यरात्री धाडसी कारवाई करत जामखेड शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरातून तब्बल ६ लाख ३४ हजार १४६ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मालवाहू टेम्पोसह संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

ही कारवाई दि. १५ मे रोजी रात्री सुमारे १०.२५ वाजण्याच्या सुमारास जामखेड-मोरेवस्ती रोडलगत प्रोफेसर कॉलनी परिसरात करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार खर्डा पोलिसांनी छापा टाकला असता, बाळु ऊर्फ शिवदत्त नंदकुमार मोहिते (रा. बोराटे वस्ती, जामखेड) याच्या ताब्यातील महेंद्रा जितो मालवाहू बंद बॉडी टेम्पो (एमएच १२ एनएक्स २१८३) मध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला.

कारवाईदरम्यान डायरेक्टर स्पेशल, विमल, सुपर साऊंड, सम्राट, एम. सिलेक्ट, एमएनडी तसेच प्रीमियम शॉट या विविध कंपन्यांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त तंबाखूजन्य मालाची किंमत २ लाख ५९ हजार १४६ रुपये असून मालवाहू टेम्पोची अंदाजे किंमत ३ लाख ७५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारे एकूण ६ लाख ३४ हजार १४६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४ व २७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई बाळु शांतीलाल खाडे यांनी फिर्याद दिली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल बाळु खाडे, वैजिनाथ मिसाळ, धनराज बिराजदार तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत.

Leave a Comment

error: