श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

Spread the love

समर्थ देवमुंडे राज्यात ३५ वा, मानवी हजारे राज्यात २६३ वी; ३२ पैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण; दोघांनीही NMMS आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत पटकावली शिष्यवृत्ती

जामखेड: रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाने राज्यस्तरीय इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. विद्यालयातील ३२ विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, दोन विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्तीवर आपली मोहोर उमटवली आहे.

विद्यालयातील समर्थ भरत देवमुंडे याने २४६ गुण मिळवत राज्यात ३५ वा क्रमांक पटकावला, तर मानवी प्रभाकर हजारे हिने २१२ गुणांसह राज्यात २६३ वा क्रमांक मिळवत शिष्यवृत्ती प्राप्त केली. विशेष म्हणजे हे दोन्ही विद्यार्थी यापूर्वी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेतही शिष्यवृत्तीधारक ठरले होते. आता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतही त्यांनी उल्लेखनीय यश मिळवत दुहेरी शिष्यवृत्तीचा मान मिळविला आहे.

या निकालामुळे विद्यालयाचा एकूण उत्तीर्णतेचा टक्का समाधानकारक राहिला असून, विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाबरोबरच शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन, सराव परीक्षा, विशेष मार्गदर्शन वर्ग आणि पालकांचे सहकार्य या यशामागील प्रमुख घटक ठरले. या यशासाठी विद्यालयाचे प्राचार्य बी. डी. जोरे, पर्यवेक्षक के. जी. बिरंगल, विभाग प्रमुख एस. डी. शेख, बुद्धिमत्ता मार्गदर्शक बी. बी. येवले, गणित मार्गदर्शक गाडे सर, मराठी मार्गदर्शक आंधळे सर तसेच इंग्रजी मार्गदर्शक श्रीमती पठाण मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशामुळे विद्यालय, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, समर्थ देवमुंडे व मानवी हजारे यांनी विद्यालयासह गावाचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. विद्यालयाच्या वतीने या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही कौतुक करण्यात आले. स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच जवळा ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

error: