‘बॉबी’चा पुडा मागितला अन् क्षणात आजीच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास!

Spread the love

जामखेडमध्ये भरदिवसा धाडसी घटना; ९० वर्षीय वृद्धेला गाफील ठेवत चोरट्याची चलाखी, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू

जामखेड: जामखेड शहरात भरदिवसा घडलेल्या एका धाडसी चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. खाडेनगर परिसरातील किराणा दुकानात बसलेल्या ९० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने क्षणात लंपास केली. ‘बॉबी’चा पुडा घेण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या तरुणाने वृद्धेला गाफील ठेवत ही चोरी केली. गुरुवारी (दि. २) दुपारी सुमारे २ वाजता ही घटना घडली.

याप्रकरणी हौसाबाई कुंतीलाल भंडारी (वय ९०, रा. खाडेनगर, जामखेड) यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाडेनगर येथील ‘नवकार’ किराणा दुकानात हौसाबाई भंडारी या नेहमीप्रमाणे बसल्या होत्या. त्यावेळी अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील एक अनोळखी तरुण दुकानात आला. त्याने ‘बॉबी’चा पुडा मागितला. वृद्ध महिला वस्तू देण्यासाठी पुढे वाकल्या असताना त्याच संधीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन अत्यंत सफाईने हिसकावली. त्यानंतर कोणालाही संशय येण्यापूर्वीच तो तेथून पसार झाला.

काही वेळानंतर हौसाबाई यांच्या गळ्यातील चेन नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर परिसरात शोधाशोध करण्यात आली. मात्र संशयिताचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेर जामखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, संशयित तरुणाची ओळख पटविण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या चोरीमुळे व्यापारी, दुकानदार तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः एकटे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना अधिक सतर्क राहावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: