लाडक्या बहिणींना दोन दिवसांत डबल खुशखबर! मार्चनंतर एप्रिलचाही हप्ता जमा; दोन दिवसांत ३ हजार जमा

Spread the love

मुंबई : महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली असून, राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काल मार्च महिन्याचे १५०० रुपये जमा झाल्यानंतर आज अनेक महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे आणखी १५०० रुपये जमा झाल्याचे संदेश प्राप्त होत आहेत. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण ३ हजार रुपये जमा झाले आहेत.

राज्यातील कोट्यवधी महिला मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. यापूर्वी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता २४ मार्च रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर पुढील दोन महिन्यांचे हप्ते रखडल्याने महिलांमध्ये नाराजी होती. अखेर राज्य सरकारने १४ मे रोजी मार्च महिन्याचा आणि १५ मेपासून एप्रिल महिन्याचा हप्ता वर्ग करण्यास सुरुवात केल्याने लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.

महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर ही योजना सुरू केली होती. जुलै २०२४ पासून या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा आर्थिक मदत जमा केली जात आहे. योजनेसाठी शासनाने वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपये निश्चित केली असून, इतर काही अटी व निकषही लागू करण्यात आले आहेत. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.

ई-केवायसी न केल्याने ७० लाख महिला योजनेबाहेर

योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा यासाठी शासनाने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती. काही महिलांनी शासकीय नोकरीसंदर्भातील माहिती चुकीची भरल्याने त्यांना दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती.

मात्र, वारंवार मुदतवाढ देऊनही अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही.योजनेच्या सुरुवातीला लाभार्थी महिलांची संख्या सुमारे २ कोटी ४६ लाख होती. मात्र, फेब्रुवारी २०२६ पर्यंत ही संख्या घटून १ कोटी ७६ लाखांवर आली आहे. म्हणजेच जवळपास ७० लाख महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने योजनेतून वगळण्यात आले आहे.

Leave a Comment

error: