जामखेडमध्ये अवैध दारू वाहतुकीवर एलसीबीची धडाकेबाज कारवाई; बोलेरोसह ८ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात

Spread the love

जामखेड : जामखेड शहरातून तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत बोलेरो वाहनासह तब्बल ८ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अहिल्यानगरचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि हरिष भोये यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव, सुनिल मालणकर, प्रकाश मांडगे, मनोज साखरे तसेच चालक भगवान धुळे यांचा समावेश होता.

दि. १४ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जामखेड पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बोलेरो गाडी क्रमांक एमएच १६ डीएम ९२४४ मधून देशी व विदेशी दारूचे बॉक्स विक्रीसाठी वाहतूक करण्यात येणार आहे.

माहितीच्या आधारे पथकाने खर्डा रोडवरील मारुती मंदिराजवळ सापळा रचला. काही वेळात संशयित बोलेरो वाहन येताना दिसताच पोलिसांनी वाहन थांबवून चालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव शरद बाबासाहेब शिकारे (वय ३७, रा. शिकारेवस्ती, बाळगव्हाण ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) असे सांगितले.

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता ६३ हजार रुपयांची देशी-विदेशी दारू व ७ लाख ५० हजार रुपये किमतीची बोलेरो चारचाकी असा एकूण ८ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९७/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

अवैध धंद्यांची माहिती देण्याचे आवाहन

अहिल्यानगर जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या ०२४१-२४१६१११ या क्रमांकावर किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

error: