माहिजळगाव-नगर महामार्गावर भीषण अपघात, जामखेडच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू; एक जण गंभीर जखमी

Spread the love

जामखेड : माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात जामखेड येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे जामखेड शहरासह परिसरात शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड येथील ज्येष्ठ विधिज्ञ भगवान जायभाय यांचे चिरंजीव अँड. विराज भगवान जायभाय (वय २५) हे पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. मोठ्या भावाच्या लग्नानिमित्त ते जामखेड येथे आले होते. लग्नकार्य आटोपल्यानंतर रविवारी (दि. ११) रात्री अँड. विराज जायभाय, सोनु डुचे (वय २४) आणि त्यांचा पुणे येथील एक मित्र हे तिघेजण पुण्याकडे निघाले होते.

ते आय-२० (एमएच १७ एझेड ३२४२) या चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावरील आंबिलवाडी गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचा अंदाज चुकला. भरधाव वेगातील कार रस्ता सोडून थेट शेतात घुसली आणि अनेक पलट्या मारत उलटली.

अपघात इतका भीषण होता की अँड. विराज जायभाय आणि सोनु डुचे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला पुणे येथील मित्र गंभीर जखमी झाला आहे. अपघाताचा मोठा आवाज ऐकून जवळील घरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना गाडीतून बाहेर काढले आणि जामखेड येथील नातेवाईकांना घटनेची माहिती दिली.या दुर्दैवी घटनेमुळे जामखेड शहरातील मित्रपरिवार, नातेवाईक आणि विधिज्ञ क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत.

दरम्यान, अँड. विराज जायभाय यांच्या निधनाबद्दल जामखेड तालुका वकील संघाने शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दुःखात सहभागी होत पुढील दोन दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वकील संघाचे अँड. अमीर खान यांनी दिली.

Leave a Comment

error: