अरणगावचा स्तुत्य उपक्रम, सायंकाळी ७ ते ९ विद्यार्थ्यांचा नियमित अभ्यास; पाहणी पथक, पालकांचा सहभाग अन् गुणवंतांना बक्षिसांचीही योजना
जामखेड : डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडिया आणि दूरचित्रवाणी मालिकांच्या वाढत्या आकर्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय कमी होत असल्याची चिंता व्यक्त होत असताना, जामखेड तालुक्यातील अरणगावने त्यावर प्रभावी उपाय शोधला आहे. गावातील विघ्नहर्ता फाउंडेशन व ग्रामस्थांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेला ‘अभ्यासाचा भोंगा’ हा उपक्रम सध्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करत असून, संपूर्ण गावात शैक्षणिक वातावरण तयार होत आहे.
या उपक्रमांतर्गत दररोज सायंकाळी नेमके ७ वाजता गावात भोंगा वाजविला जातो. भोंगा वाजताच घराघरांत टीव्ही आणि मोबाईल बाजूला ठेवून विद्यार्थी अभ्यासाला बसतात. रात्री ९ वाजेपर्यंत दोन तास नियमित अभ्यास करण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्याला विद्यार्थ्यांसह पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
वाढत्या मोबाईल वापरामुळे विद्यार्थी अभ्यासापासून दूर जात असल्याचे चित्र लक्षात घेऊन विघ्नहर्ता फाउंडेशनने हा उपक्रम सुरू केला. या दोन तासांच्या कालावधीत पालकांनीही मुलांसाठी शांत आणि अभ्यासपूरक वातावरण तयार करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य, वेळेचे नियोजन आणि शिस्त निर्माण होत असल्याचे पालकांनी सांगितले.
उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विघ्नहर्ता फाउंडेशनची अभ्यास पाहणी टीम दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत गावात फिरून विद्यार्थी अभ्यास करत आहेत का, याची पाहणी करत आहे. या भेटीदरम्यान विद्यार्थी आणि पालकांना नियमित अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगत असून, उपक्रमात सातत्याने सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसेही देण्यात येणार आहेत.
“विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची शिस्त आणि नियमितपणा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पालकांनीही या दोन तासांत मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करावे. शिक्षणातूनच सक्षम समाज आणि सक्षम नागरिक घडू शकतात.”‘एक भोंगा म्हणजे उद्याचा सक्षम नागरिक’ आणि ‘शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग’ या घोषवाक्यांसह सुरू झालेला हा उपक्रम अरणगावच्या शैक्षणिक वाटचालीत नवे पर्व ठरत असून, ग्रामीण भागातील इतर गावांसाठीही तो प्रेरणादायी ठरत असल्याचे विघ्नहर्ता फाउंडेशनचे सदस्य शंकर गदादे यांनी सांगितले.
डिजिटल व्यसनावर गावाचा अनोखा उपाय
मोबाईल, सोशल मीडिया आणि टीव्हीच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे असलेला ओढा कमी होत असल्याची चिंता लक्षात घेऊन अरणगावात ‘अभ्यासाचा भोंगा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दररोज दोन तास विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून अभ्यास करावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असून त्याला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.










