खर्ड्याची कन्या धारा बीडकर भारतीय तिरंदाजी संघात, सब ज्युनिअर आशियाई स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व

Spread the love

अवघ्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; जामखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

जामखेड : जामखेड तालुक्यातील खर्डा गावाची कन्या कु. धारा बीडकर हिने आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. खर्डा येथील मूळ रहिवासी तथा सध्या पुणे येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. अमोल बीडकर यांच्या कन्येची संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे होणाऱ्या सब ज्युनिअर आशियाई युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी (Sub-Junior Asian Youth Archery Championship) भारतीय संघात निवड झाली आहे. अवघ्या १५ व्या वर्षी भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळाल्याने खर्डा गावासह जामखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

तिरंदाजीसारख्या अत्यंत कौशल्यपूर्ण खेळात सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर धाराने हे यश मिळवले आहे. लहान वयापासूनच तिने या खेळात विशेष प्राविण्य मिळवत विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांतील सातत्यपूर्ण यशाच्या बळावर तिची भारतीय संघात निवड झाली आहे.

धाराच्या यशामागे तिच्या कुटुंबीयांचे, प्रशिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान आहे. वडील डॉ. अमोल बीडकर यांनी तिच्या क्रीडा कारकिर्दीसाठी सातत्याने पाठबळ दिले, तर आईने सराव, स्पर्धा आणि प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत प्रोत्साहन दिले. प्रशिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे तिच्या खेळात सातत्याने प्रगती झाली.

धाराचे आजोबा अशोक बीडकर हे निवृत्त रयत सेवक असून आजी महानंदा बीडकर या खर्डा येथे बांगड्यांचा व्यवसाय करतात. नातीच्या या यशामुळे संपूर्ण बीडकर कुटुंबासह खर्डा गावात आनंदाचे वातावरण आहे.

भारतीय संघाची जर्सी परिधान करून देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान प्रत्येक खेळाडूसाठी सर्वोच्च मानला जातो. धारा बीडकरने हे स्वप्न साकार करत खर्ड्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले आहे. तिच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱ्या स्पर्धेत धारा बीडकरने उत्कृष्ट कामगिरी करून भारताला पदक मिळवून द्यावे आणि देशासह खर्डा, जामखेड तालुका व अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव अधिक उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: