जामखेड : तालुक्यातील बालाघाट पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या मुंगेवाडी वनक्षेत्रातील वन्यजीवांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या माती बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी वन विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे परिसरातील पाणीसाठ्यावर परिणाम होऊन वन्यजीव, पशुपक्षी आणि नैसर्गिक वनसंपदेपुढे पाण्याचे संकट निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर सहायक उपवनसंरक्षक गणेश मिसाळ यांनी नुकतीच प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून दुरुस्तीचा प्रस्ताव तयार केला असून तो मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
मुंगेवाडी वनक्षेत्रातील हा माती बंधारा बालाघाट पर्वतरांगेतील महत्त्वाच्या जलस्रोतांपैकी एक मानला जातो. उन्हाळ्याच्या काळात वनक्षेत्रातील विविध वन्यप्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी तसेच अन्य जीवसृष्टीसाठी हा जलस्रोत आधार ठरतो. याचबरोबर परिसरातील झाडे, झुडपे, औषधी वनस्पती आणि नैसर्गिक वनस्पतींच्या वाढीसाठीही या बंधाऱ्यातील पाण्याचा मोठा उपयोग होतो.
गेल्या वर्षीच्या मुसळधार पावसामुळे बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेल्याने पाणी साठवण क्षमतेवर परिणाम झाला. परिणामी वनक्षेत्रातील जलव्यवस्थापनावर विपरीत परिणाम झाला. यामुळे बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांकडून सातत्याने सांगितले जात होते.
बालाघाट पर्वतरांग ही जैवविविधतेचा समृद्ध वारसा जपणारा परिसर म्हणून ओळखली जाते. येथे विविध प्रकारचे वन्यप्राणी, दुर्मीळ पक्षी, औषधी वनस्पती आणि नैसर्गिक वनसंपदा आढळते. त्यामुळे या भागातील जलस्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
वन विभागाने तयार केलेल्या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळाल्यास बंधाऱ्याची दुरुस्ती करून जलसाठा पूर्ववत करण्यास मदत होणार आहे. यामुळे वन्यजीवांना वर्षभर पाण्याची उपलब्धता राहण्यासोबतच परिसरातील पर्यावरणीय समतोल राखण्यासही मोठा हातभार लागणार आहे.
दरम्यान, पाहणीवेळी सहायक उपवनसंरक्षक गणेश मिसाळ, कर्जत-जामखेड वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता हराळ, वनरक्षक धर्मवीर तोरंबे, वनपाल रवी राठोड, वनरक्षक शांतिराज सपकाळ, वनरक्षक नागेश तेलंगे, वनमजूर राघू सुरवसे तसेच वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी दुरुस्तीच्या प्रस्तावास तातडीने मंजुरी देऊन काम युद्धपातळीवर सुरू करण्याची मागणी केली आहे.










