जामखेड: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) मंजूर विहिरीच्या कामाची पाहणी, मोजमाप व जिओटॅगिंग करण्यासाठी गेलेल्या पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यकावर शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील लोणी येथे घडली आहे. शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, संबंधिताविरुद्ध खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दिपक दत्तात्रय बोराडे (वय ४०, रा. मलठण, ता. कर्जत) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोराडे हे पंचायत समिती, जामखेड येथे तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि. १७ जून २०२६) रोजी सकाळी सुमारे ९ वाजता बोराडे हे ग्रामरोजगार सेवक शिवाजी आप्पा बामदळे व विहीर लाभार्थी अविनाश बबन घुमरे यांच्यासह लोणी येथे मनरेगा अंतर्गत मंजूर विहिरीच्या कामाचे मोजमाप व जिओटॅगिंग करण्यासाठी गेले होते. शासकीय नियमांनुसार सुरू असलेल्या या कामादरम्यान अचानक अन्सार नवाब पठाण (रा. लोणी, ता. जामखेड) घटनास्थळी आला.
फिर्यादीनुसार, “गावात येण्यापूर्वी मला सांगायला हवे होते,” असे म्हणत त्याने बोराडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ करत आक्रमक भूमिका घेतली. परिस्थितीचे चित्रीकरण करण्यासाठी मोबाईलवर व्हिडिओ सुरू केल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात बोराडे यांची गचांडी पकडून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता हातातील दगड त्यांच्या डाव्या पायाच्या पिंढरीवर फेकून मारल्याने त्यांना दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मारहाणीनंतर आरोपीने “यापुढे गावात आलास तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली आणि तेथून निघून गेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या घटनेमुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात विकासकामांच्या पाहणीसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, खर्डा पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण काय होते, याचाही पोलीस तपास करत आहेत.










