खर्ड्यात आंतरराष्ट्रीय योग दिनी १०८ ओंकार जपातून पावसासाठी साकडे

Spread the love

आर्ट ऑफ लिव्हिंग, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व विद्यालयाचा संयुक्त उपक्रम; योग, प्राणायाम व ध्यानातून निरोगी जीवनाचा संदेश

जामखेड: मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खर्ड्यात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सामूहिक १०८ ओंकार जप करून चांगल्या पावसासाठी साकडे घालण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या उपक्रमात विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ आणि आरोग्यप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेत योग, प्राणायाम व ध्यानाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश दिला.

दैनिक लोकमत, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार खर्डा, खर्डा पोलीस स्टेशन, खर्डा ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोष थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ पाटील आणि मुख्याध्यापक लक्ष्मण गदादे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

यानंतर आयोजित सामूहिक योग सत्रात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक संतोष थोरात, तुळशीदास गोपाळघरे आणि सेवानिवृत्त सैनिक बबन नाईक यांनी योगासने, नाडीशोधन प्राणायाम, सूर्यनमस्कार, सूक्ष्म व्यायाम आणि ध्यान यांचे मार्गदर्शन केले. योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक स्वास्थ्यही सुदृढ राहते, असे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या सामूहिक १०८ ओंकार जपामध्ये उपस्थितांनी विश्वशांती, पर्यावरण संवर्धन आणि चांगल्या पर्जन्यवृष्टीसाठी प्रार्थना केली. ओंकाराच्या निनादाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.

योग दिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निसर्गरम्य वातावरणात आयोजित या सार्वजनिक कार्यक्रमास नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.

कार्यक्रमास लोकमत प्रतिनिधी संतोष थोरात, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक रवींद्र कुलकर्णी, वैशाली थोरात, धनसिंग साळुंखे, डॉ. बिपीनचंद्र लाड, रवींद्र शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय जायभाय, पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ मिसाळ, गणेश बडे, बाळासाहेब खाडे, होमगार्ड युनिटचे सदस्य तसेच विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. रामनाथ ढाकणे, प्रा. शिवशंकर ठाकरे, प्रा. मुक्तेश्वर फामदे आणि पर्यवेक्षक तुकाराम विधाते आदी उपस्थित होते.

Leave a Comment

error: