महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले कार्यवाहीचे निर्देश; सीमावर्ती गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा
जामखेड: खर्डा व परिसरातील नागरिकांची महसुली तसेच प्रशासकीय कामांसाठी होणारी गैरसोय दूर करण्याच्या उद्देशाने जामखेड तालुक्यातील खर्डा येथे नवीन अपर तहसील कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जामखेड तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रालय, मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन केली. यावेळी त्यांनी सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनाची दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे तातडीने निर्देश दिल्याची माहिती गोलेकर यांनी दिली.
गोलेकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, महसूल प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी, नागरिकांना स्थानिक स्तरावर शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच भौगोलिक परिस्थितीचा विचार करता खर्डा येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालय सुरू करणे आवश्यक आहे. जामखेड तालुक्यातील जवळपास निम्मी गावे या प्रस्तावित कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट होऊ शकतात.
खर्डा ते जामखेड हे अंतर सुमारे २२ किलोमीटर असले तरी तालुक्याच्या सीमावर्ती भागातील अनेक गावांतील नागरिकांना महसुली कामांसाठी ३० ते ४० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करावा लागतो. माळेवाडी (४० कि.मी.), दिघोळ (३७ कि.मी.), जातेगाव (३७ कि.मी.), धनेगाव (३५ कि.मी.) आणि मुंगेवाडी (३१ कि.मी.) या गावांतील नागरिकांना विविध दाखले, फेरफार, वारसा नोंदी, जमीनविषयक प्रकरणे तसेच इतर महसुली कामांसाठी वारंवार जामखेड येथे जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
खर्डा हे परिसरातील महत्त्वाचे व्यापारी व शैक्षणिक केंद्र असून दळणवळणाच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणूनही खर्ड्याची ओळख असल्याने या भागात प्रशासकीय सुविधांचा विस्तार करणे ही काळाची गरज असल्याचे गोलेकर यांनी नमूद केले.
या मागणीसाठी आमदार रोहित पवार आणि खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असून खर्डा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू राहतील, असेही गोलेकर यांनी स्पष्ट केले.










