जन्मदाखल्यासाठी लाचेची मागणी; ACB विभागाची धडक कारवाई
जामखेड :जामखेड नगरपरिषदेत जन्मदाखला देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लिपिक व मदतनीस अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. या कारवाईमुळे नगरपरिषदेत एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी अभिजीत जालिम भैसडे (वय ३९, लिपिक, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, नगरपरिषद जामखेड) व अहमद इलियास शेख (वय ४३, मदतनीस, अग्निशामक दल – कंत्राटी) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७अ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जामखेड पोलीस ठाण्यात सुरू आहे.
तक्रारदाराने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी आपल्या मुलगा व मुलीचा जन्मदाखला मिळण्यासाठी नगरपरिषदेत अर्ज केला होता. त्यानंतर संबंधित कामासाठी भैसडे यांची भेट घेतली असता त्यांनी शेख यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. शेख यांनी प्रत्येक दाखल्यासाठी १५०० रुपये याप्रमाणे दोन दाखल्यांसाठी एकूण ३ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार ५ मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.
त्यानुसार ६ मे २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी सत्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. जामखेड नगरपरिषदेसमोर पंचासमक्ष आरोपी अहमद शेख यांनी तक्रारदाराकडून ३ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणात अभिजीत भैसडे यांनीही लाच स्वीकारण्यास संमती देऊन प्रोत्साहन दिल्याचे तपासात उघड झाले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पर्यवेक्षणाखाली पथकातील चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ व चालक दशरथ लाड यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, या प्रकरणामुळे जामखेड नगरपरिषदेत भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे करत आहेत.










