अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC Bank) सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची धावपळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे आज (सोमवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, नगर शहरात त्यांच्या समर्थकांकडून भव्य शक्तिप्रदर्शन घडवून आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे आज समर्थकांच्या मोठ्या ताफ्यासह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते कर्जत की जामखेड यांपैकी कोणत्या मतदारसंघातून अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
‘बिनविरोध’च्या प्रयत्नांना सुरुंग; ८०० हून अधिक अर्जांचा उफराटा विक्रम
जिल्हा बँकेची निवडणूक सर्वपक्षीय सहमतीने बिनविरोध व्हावी, यासाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन संगमनेरमध्ये बैठकांचे सत्र घडवून आणले होते. मात्र, प्रस्थापितांच्या या चालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रा. राम शिंदे यांच्यासह खासदार नीलेश लंके यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली.
इच्छुकांकडून तब्बल ८०० पेक्षा अधिक अर्जांची उचल झाल्याने प्रस्थापितांची बिनविरोधची रणनीती निष्फळ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. सहकार क्षेत्रातील प्रस्थापितांना थेट आव्हान देण्यासाठी आता विस्थापितांचा तिसरा पर्याय किंवा स्वतंत्र गट मैदानात उतरण्याची जोरदार शक्यता वर्तवली जात आहे.
राम शिंदेंचे ‘पावर प्ले’: कर्जत-जामखेडमधील मतदार सहलीवर!
आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रा. राम शिंदे यांनी आधीच राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कर्जत आणि जामखेड तालुक्यातील सोसायटी ठरावधारक मतदारांच्या बैठका घेऊन त्यांना थेट सहलीवर व देवदर्शनासाठी रवाना करण्यात आले आहे.
“जिल्ह्यात मी एकमेव नेता आहे, ज्याच्या बाजूने सर्वाधिक ठराव आहेत. प्रस्थापित आणि विस्थापित दोघांचाही केंद्रबिंदू मीच असल्याने माझ्याशिवाय कोणताही निर्णय शक्य नाही,” असा थेट इशारा देत प्रा. शिंदेंनी महायुतीतील नेत्यांची झोप उडवली आहे.
विखे-थोरात गटाकडून मनधरणीचे प्रयत्न
प्रा. राम शिंदेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे महायुतीत आणि सहकार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, “राम शिंदे यांच्या विधानपरिषद सभापती पदाचा पूर्ण मानसन्मान राखूनच तोडगा काढला जाईल आणि त्यांना विचारात घेतल्याशिवाय निर्णय होणार नाही,” अशी मवाळ भूमिका डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतली आहे.
नगरमध्ये आज राजकीय दिग्गजांचा राबता
सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने प्रा. राम शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील इतर प्रमुख पक्षांचे दिग्गज नेते आणि खासदार-आमदार मोठ्या लवाजम्यासह नगर शहरात दाखल होणार आहेत. राम शिंदेंच्या अर्ज दाखल करण्याच्या टायमिंगमुळे आणि समर्थकांच्या संभाव्य गर्दीमुळे जिल्हा बँकेच्या आवारात राजकीय वातावरणात मोठी उष्णता निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाच तालुक्यांमध्ये आजी-माजी आमदारांमध्येच स्पर्धा आहे. अर्ज माघारी घेण्याची तारीख २१ ऑक्टोबर असून २ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.









