जामखेड : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC Bank) निवडणुकीचे वेध लागताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा बँक निवडणुकीसाठी रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर अतिशय आक्रमक आणि बोचऱ्या शब्दांत हल्ला चढवला आहे. “तीन अपत्ये असतानाही राम शिंदे निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीला साधे कायदे आणि नियमही माहित नसतील, तर याला बौद्धिक दुष्काळ म्हणावा लागेल,” असा सणसणीत टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी प्रा. राम शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. रोहित पवार म्हणाले की, “विधानपरिषदेसारख्या कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतींनाच कायदे-नियम माहित नसतील तर याला काय बोलावं? राज्यात पडलेल्या दुष्काळासोबतच घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या आणि त्यांच्या कार्यालयाच्या बौद्धिक दुष्काळाचंही दर्शन त्यांनी महाराष्ट्राला घडवलं आहे.”
रोहित पवार यांच्या टीकेतील प्रमुख मुद्दे:
- राजकीय हेतूनेच पद दिल्याचा आरोप: कर्जत-जामखेड मतदारसंघात केवळ मला विरोध करण्यासाठी आणि मतदारसंघात मला गुंतवून ठेवण्यासाठीच प्रा. राम शिंदे यांना विधानपरिषदेचे सभापतीपद देण्यात आले, हे सूर्यप्रकाशाइतकं ढळढळीत सत्य आहे.
- उत्सव मंडळाच्या निवडणुकीसाठी मुक्त करा: साधे कायदे-नियम माहित नसलेल्या व्यक्तीला सभापतीपदावरून तातडीने हटवून गणपती मंडळाच्या किंवा स्थानिक उत्सव मंडळाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी मुक्त करावे. यामुळे सभापतीपदासारख्या प्रतिष्ठेच्या पदाची अप्रतिष्ठा टळेल आणि महाराष्ट्राचे नुकसान होणार नाही.
- भाजप कार्यकर्त्यांवर भाष्य: सगळीकडेच प्रा. राम शिंदे यांचा झेंडा लावला जात असल्यामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची अवस्था ‘हाथ खाली और बजाओ ताली’ अशी झाली आहे.
- हुशार आमदाराला संधी द्या: प्रा. राम शिंदे यांना सभापतीपदावरून हटवल्यास किमान कायद्याची जाण असलेल्या एखाद्या हुशार आमदाराला या पदावर काम करण्याची संधी मिळेल.
अहिल्यानगरच्या सहकार अन् राजकारणात खळबळ
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सहकार क्षेत्रातील सत्ताकारणावर पकड मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच कर्जत-जामखेडमधील पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील हा संघर्ष आता कायदेमंडळ विरुद्ध सहकार असा रंग घेऊ लागला आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या या आक्रमक पोस्टमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, यावर प्रा. राम शिंदे व भाजप गोटातून काय प्रत्युत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









