मांगी तलाव लाभक्षेत्रातील २२ गावांच्या ग्रामपंचायतींनी शासन निर्णयाविरोधात ठराव मंजूर; उद्या टेंभुर्णी-नगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन
जामखेड: करमाळा तालुक्यातील दुष्काळी भागातील २२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आधार असलेल्या मांगी तलावातील पाणी जामखेड तालुक्यातील हळगाव येथील कृषी विद्यालयासाठी देण्याच्या शासन निर्णयाविरोधात परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ उद्या सोमवार (दि. २२) रोजी मांगी बसथांब्याजवळ टेंभुर्णी-नगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती मांगी तलाव पाणी बचाव संघर्ष समितीने दिली.
मांगी तलाव लाभक्षेत्रातील २२ गावांच्या ग्रामपंचायतींनी शासन निर्णयाविरोधात ठराव मंजूर केले आहेत. दुष्काळी भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना तलावातील पाणी दुसऱ्या तालुक्यात देण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
मांगी तलाव हा पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून, गेल्या ५५ वर्षांच्या इतिहासात तो केवळ आठ ते दहा वेळाच पूर्ण क्षमतेने भरल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सुमारे एक टीएमसी क्षमतेच्या या तलावात बहुतांश वर्षी ५० ते ६० टक्केच पाणीसाठा होतो. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच तलावातील पाणी संपण्याची वेळ येते.
तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता घटली आहे. परिणामी दोन ते अडीच महिन्यांत पाणीसाठा कमी होतो. याचा फटका लाभक्षेत्रातील गावांना बसत असून, दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मांगी तलाव लाभक्षेत्रासह १२ गावांची बोरगाव पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांच्या गरजा पूर्ण न होता तलावातील पाणी बाहेर वळविण्याचा निर्णय संतापजनक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
दरम्यान, शासनाने संबंधित निर्णय तातडीने मागे घ्यावा किंवा मांगी तलावाचा कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समावेश करून कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. आंदोलनासाठी प्रशासनाची अधिकृत परवानगी घेण्यात आली असून, २२ गावांतील शेतकरी, ग्रामस्थ, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.










