जामखेड : ‘बळीराजाचा नादच खुळा!’ याचा प्रत्यय शनिवारी (दि. १९ सप्टेंबर) जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत पाहायला मिळाला. परिसरातील नामांकित मानल्या जाणाऱ्या जामखेडच्या आठवडे बाजारात एकाच बैलावर तब्बल १ लाख ७१ हजार रुपयांची भलीमोठी बोली लागली. या विक्रमी व्यवहाराने संपूर्ण पशुधन बाजार गाजला असून, उत्तम अवलादीच्या पशुधनासाठी शेतकरी आजही कितीही किंमत मोजायला तयार असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील रायमोहा येथील अल्ताफ पठाण यांनी आपला मजबूत आणि सुदृढ बैल विक्रीसाठी जामखेड बाजारात आणला होता. या बैलाचा रुबाब आणि कामसू ठेवण पाहून पाटोद्याच्याच गितेवाडी येथील शेतकरी संतोष फुंदे हे भुलले. त्यांनी क्षणाचाही उशीर न करता १ लाख ७१ हजार रुपये मोजून हा बैल खरेदी केला आणि बाजारात या ‘लाखमोलाच्या’ सौद्याचीच चर्चा रंगली.
जामखेड हे शहर अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले असल्याने येथील आठवडे बाजार पशुधनाच्या खरेदी-विक्रीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. सांगोला, पंढरपूर, सांगली या भागांतून बैल, गायी व शेळी-मेंढ्यांची येथे प्रचंड आवक असते. विशेष म्हणजे, थेट कर्नाटक राज्यातूनही शेळी-मेंढ्यांचे व्यापारी जामखेडच्या बाजारात नियमित हजेरी लावतात.
पशुधनाचा दर्जा, मिळणारा योग्य भाव आणि रोज होणारी लाखांची उलाढाल यामुळे जामखेड बाजार समितीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. या मोठ्या व्यवहाराने बाजारात व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
या खास सौद्याच्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भगवान मुरूमकर, उपसभापती नंदकुमार गोरे व संचालक मंडळाचे सचिव दिलीप तिजोरे यांच्यासह भागातील शेतकरी, व्यापारी आणि पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









