जामखेड: बचत गट म्हटले की केवळ दरमहा बचत करून छोट्या-छोट्या आर्थिक गरजा भागविण्यापुरते मर्यादित राहण्याचे चित्र ग्रामीण भागात दिसते. मात्र, बचतीच्या माध्यमातून व्यवसाय उभा करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची दिशा महिलांना मिळावी, यासाठी जामखेड पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. पंचायत समितीच्या आवारात कॅन्टीन सुरू करण्यासाठी ‘ओम साई महिला बचत गटाला’ जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय गटविकास अधिकारी शुभम जाधव यांनी घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण महिलांच्या घरगुती उद्योगाला थेट शासकीय कार्यालयाच्या आवारात व्यवसायाचे हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
ओम साई महिला बचत गटाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या ‘आईचा वडापाव’ या घरगुती उद्योगाला पंचायत समितीच्या आवारात जागा उपलब्ध झाल्याने महिलांच्या उद्योगाला मोठी संधी निर्माण झाली आहे. घरच्या घरी तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांना आता नियमित ग्राहकवर्ग मिळणार असून व्यवसायाचा विस्तार करण्यासाठीही मदत होणार आहे.
जामखेड पंचायत समितीच्या कार्यालयात तालुक्यातील ग्रामीण भागातून नागरिक, शेतकरी तसेच विविध कामांसाठी लाभार्थी दररोज येत असतात. याशिवाय पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी यांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे पंचायत समितीच्या आवारातच कॅन्टीन सुरू झाल्याने येणाऱ्या नागरिकांना चहा, नाश्ता आणि खाद्यपदार्थ सहज उपलब्ध होणार आहेत.
‘आईचा वडापाव’च्या माध्यमातून स्वच्छता, घरगुती चव आणि वाजवी दर यावर भर देण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांची सोय होण्याबरोबरच महिला बचत गटाच्या व्यवसायालाही नियमित बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे.
महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिक शिस्त आणि बचतीची सवय लागली आहे. मात्र, बचतीसोबतच त्या निधीचा उपयोग उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी झाला तर महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला अधिक बळ मिळू शकते. ‘आईचा वडापाव’ या उपक्रमातून याच दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे.
स्वतःच्या कष्टातून व्यवसाय उभारणाऱ्या महिलांना सुरुवातीच्या काळात जागा, ग्राहक आणि बाजारपेठ मिळणे हे मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत शासकीय कार्यालयाच्या आवारातच व्यवसायासाठी जागा उपलब्ध झाल्याने महिला बचत गटाला ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे.
ग्रामीण भागातील महिलांकडे पाककलेचे कौशल्य, घरगुती खाद्यपदार्थ तयार करण्याचा अनुभव आणि व्यवसाय करण्याची इच्छाशक्ती असली तरी बाजारपेठेअभावी अनेक उपक्रम मर्यादित राहतात. अशा स्थानिक उद्योगांना शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळाल्यास महिलांना व्यवसाय वाढविण्याची संधी मिळू शकते.
“महिला बचत गटांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून स्थानिक महिलांना व्यवसायासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून, यामुळे महिलांच्या स्वावलंबनाला निश्चितच चालना मिळेल.”
— शुभम जाधव – गटविकास अधिकारी, जामखेड









