जामखेड : जामखेड शहरात भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे खर्डा रोडवरील बोराटे वस्ती येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला चढवून एका दीड वर्षाच्या बालिकेचा डोळा निकामी केला, तर अन्य दोघांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे जामखेडकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
खर्डा रोडवरील बोराटे वस्ती येथे घरासमोर खेळत असणारी चिमुकली कु. जागृती सौरभ बेल्हेकर (वय १.५ वर्षे) हिच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक भयंकर हल्ला चढवला. या हल्ल्यात चिमुकलीच्या डाव्या डोळ्याला अत्यंत गंभीर इजा झाली. तिला तातडीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली; मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही दुर्दैवाने तिचा डावा डोळा पूर्णपणे निकामी झाला आहे. उपचारासाठी तब्बल १० लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आल्याने बेल्हेकर कुटुंब हादरून गेले आहे.
इतर दोघेही गंभीर जखमी याच पिसाळलेल्या कुत्र्याने परिसरातील शिवराज बोराटे (वय ४ वर्षे) या बालकाच्या हाताचा, कानाचा व मानेचा चावा घेतला, तर आनंद सानप (वय २१ वर्षे) या तरुणाच्या कमरेला चावा घेऊन त्यांनाही गंभीर जखमी केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर स्थानिक तरुणांनी या पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अजूनही हाती आलेले नाही.
नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांचा रोष जामखेड शहरात ठिकठिकाणी पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज २० ते २५ तक्रारी नगरपालिकेकडे जाऊनही ‘अपुरी यंत्रणा’ असल्याचे कारण सांगून प्रशासन कारवाई टाळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
एका निष्पाप चिमुकलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी आता जामखेड शहरातून केली जात आहे.









