स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तीन गुन्हे दाखल, सहा आरोपी फरार
जामखेड : तालुक्यात अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. १९ व २० ऑगस्ट रोजी जामखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी छापे टाकून ७० हजार ८२६ रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, सहा आरोपी फरार आहेत.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दोन पथके तयार केली. पथकांनी जामखेड तालुक्यात अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांची माहिती संकलित करून छापेमारी सुरू केली.
पहिल्या कारवाईत खर्डा येथील शरद पुंडलीक शिंदे (वय २१) याच्याकडून १३ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शरद शिंदे याच्यासह तुषार राळेभात, सार्थक राळेभात आणि राजू घोडके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघे फरार आहेत.
दुसऱ्या कारवाईत कोल्हेवाडी येथील सुधीर अंकुश कोल्हे (वय ४९) याच्याकडून १६ हजार ६८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सुधीर कोल्हे, तुषार राळेभात आणि राजू घोडके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघे फरार आहेत.
तिसऱ्या कारवाईत जामखेड येथील समीर रशीद सय्यद (वय १९) याच्याकडून सर्वाधिक ४० हजार ४०८ रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी समीर सय्यद याच्यासह भिंगार येथील फैयाज तांबोळी आणि जामखेड येथील राजू घोडके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघे फरार आहेत.
या तिन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी कृष्णकुमार सेदवाड व पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, सुनील मालणकर, भगवान थोरात, विशाल तनपुरे, गणेश लोंढे, बिरप्पा करमल, सतीश भवर, निळकंठ कारखेले, योगेश भिंगारदिवे, विजय ठोंबरे, संदीप पवार, गणेश धोत्रे, शाहीद शेख आणि अरविंद भिंगारदिवे यांच्या पथकाने केली.








