कत्तलीच्या उद्देशाने विना चारा-पाण्याचे जनावरे बांधल्याचा आरोप, व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्यास जीवे मारण्याची धमकी

Spread the love

नान्नजच्या गायरानात ९ ते १० बैल आढळले, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जामखेड : नान्नज शिवारातील गायरान जमिनीत गोवंश जातीचे ९ ते १० बैल विना चारा-पाण्याचे बांधून ठेवल्याचा प्रकार समोर आला. ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचा आरोप करत त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या तरुणाला पाच जणांनी धमकावल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. याप्रकरणी नान्नज येथील पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव अरुण साठे (२९, रा. आणाभाऊ साठे नगर, नान्नज) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास साठे हे चुलत भाऊ भाऊसाहेब साहेबराव साठे, संदिप बाबुराव साठे व आकाश राजू साठे यांच्यासोबत नान्नज शिवारातील गायरान परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांना गायरानातील विविध ठिकाणी ९ ते १० बैल बांधून ठेवल्याचे दिसून आले. जनावरांना चारा व पाणी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

साठे यांनी या घटनेचे मोबाईलमध्ये जिओटॅगिंग करून व्हिडिओ चित्रीकरण केले. त्याचवेळी सोहेल कुरेशी, समीर कुरेशी, कालु कुरेशी, मुन्ना महमंद कुरेशी व सलमान इस्माईल कुरेशी तेथे आले. ‘ही जनावरे आमची आहेत,’ असे सांगत ते बैल तेथून घेऊन जात होते. यावेळी ‘तुम्ही येथे कसे आला, तुम्हाला कुणी अधिकार दिला?’ असे म्हणत साठे यांना धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

तसेच, ‘तुम्ही गावात लई माजला आहात’, असे म्हणत आणखी लोकांना बोलावून गायरानातच मारून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी काही संशयितांनी ‘आज यांचा काटाच काढू, मारून टाकतो,’ अशा स्वरूपाची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

धमकीमुळे घाबरलेल्या साठे व त्यांच्या सोबतच्या व्यक्तींनी घटनास्थळावरून पळ काढला. घरी आल्यानंतर त्यांनी डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली.

या प्रकरणी सोहेल कुरेशी, समीर कुरेशी, कालु कुरेशी, मुन्ना महमंद कुरेशी व सलमान इस्माईल कुरेशी (सर्व रा. नान्नज) यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ३ व ११, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ९ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गायरानात बांधण्यात आलेली जनावरे कोणाची होती, त्यांना कोणत्या उद्देशाने बांधण्यात आले होते, तसेच त्यांची वाहतूक करण्यात येत होती का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. फिर्यादीने केलेले व्हिडिओ चित्रीकरणही तपासाचा भाग ठरणार आहे. पुढील तपास पोलीस हवालदार तुकाराम बाबन सोनवणे करीत आहेत.

Leave a Comment