जामखेड: बाप रे! ‘आम्हाला पत्र्याची खोली बांधून द्या’ म्हटल्याने मुला-सुनेचा संताप; वृद्ध आईच्या डोक्यात मारली फुकणी, तिघांवर गुन्हा दाखल

Spread the love

जामखेड: “आम्ही छपरात राहतोय, आम्हाला राहण्यासाठी एक पत्र्याची खोली बांधून द्या,” अशी हक्काची मागणी करणाऱ्या ६२ वर्षांच्या वृद्ध आईला तिच्याच पोटच्या मुलांनी आणि सुनेने अमानुषपणे मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर संतप्त सुनेने चुलीपुढील लोखंडी फुकणी थेट सासूच्या डोक्यात मारून त्यांना रक्ताळले. ही धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पाटोदा (ग) येथे घडली असून, याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय आहे घटना?

पाटोदा (ग) येथील रहिवासी अरुणाबाई सुंदरदास खाडे (वय ६२) या पती सुंदरदास आणि सासू चंद्रभागा यांच्यासोबत छपरात राहून मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची दोन मुले रावसाहेब खाडे व कांतिलाल खाडे हे आपापल्या कुटुंबासह शेजारीच राहतात.

सोमवारी (६ ऑक्टोबर २०२६) सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास अरुणाबाई घरासमोर चूल पेटवून जेवण बनवत होत्या. त्यावेळी त्यांची दोन्ही मुले तेथे आली. वाढत्या वयामुळे छपरात राहणे त्रासदायक ठरत असल्याने अरुणाबाई यांनी मुलांना माणुसकीच्या नात्याने सांगितले, “तुम्ही मला आणि तुमच्या वडिलांना राहण्यासाठी एक पत्र्याची खोली बांधून द्या. तसेच कांतिलालने गहाण ठेवलेले सोने सोडून आणावे, म्हणजे ते विकून मी खोलीसाठी पत्रे विकत घेते.”

मायेच्या मागणीवर राग, सुनेचा डोक्यात वार

आईची ही मागणी ऐकताच दोन्ही मुलांचा पारा चढला. त्यांनी वृद्ध आईला जाब विचारत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अरुणाबाई त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्यांची सून उजाला रावसाहेब खाडे तेथे धावून आली. तिने कसलाही विचार न करता चुलीपुढील लोखंडी फुकणी उचलून थेट अरुणाबाई यांच्या डोक्यात मारली. यात अरुणाबाई गंभीर जखमी झाल्या.

मारहाण केल्यानंतर तिघांनी, “तुम्ही येथे राहायचे नाही, चालते व्हा!” असे म्हणत त्यांना गावातून हाकलून देण्याची धमकी दिली आणि दमदाटी केली. आरडाओरड ऐकून जमलेल्या ग्रामस्थांनी मध्यस्थी करत ही भांडणे सोडवली.

रुग्णालयात उपचार, पोलिसांत गुन्हा दाखल

घटनेनंतर अरुणाबाई यांची दुसरी सून शांताबाई ही मदतीला धावून आली. तिने रक्ताळलेल्या अवस्थेत अरुणाबाई यांना तात्काळ जामखेड पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांना उपचारासाठी वैद्यकीय चिठ्ठी दिली. अरुणाबाई यांनी ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे जाऊन प्राथमिक औषधोपचार घेतले आणि त्यानंतर पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली.

या तिघांवर गुन्हा दाखल:

वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून जामखेड पोलिसांनी खालील तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत:

  1. रावसाहेब सुंदरदास खाडे (मुलगा)
  2. कांतिलाल सुंदरदास खाडे (मुलगा)
  3. उजाला रावसाहेब खाडे (सून)

कायदेशीर कारवाई: या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(१), ३(५), ३५१(२), ३५२नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण अरुण इंगळे करत आहेत.

आई-वडिलांचा सांभाळ करण्याऐवजी त्यांच्यावरच हात उगारणाऱ्या मुलांच्या या कृत्यामुळे पाटोदा परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment