जामखेड:अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पहिल्याच दिवशी राडा! नगरपरिषद पथकावर दगडफेक; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हे दाखल

Spread the love

जामखेड: शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी राडा झाला आहे. उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानुसार आणि जामखेड नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सुरू झालेल्या धडक अतिक्रमणविरोधी मोहिमेला पहिल्याच दिवशी हिंसक वळण लागले. बीड रस्त्यावरील प्रसिद्ध ‘आष्टेकर स्नॅक्स’ समोरील अतिक्रमण हटवत असताना हॉटेलच्या स्लॅबवरून नगरपरिषदेच्या पथकावर थेट दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली असून, शासकीय कामात अडथळा आणून जिवंत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांवर जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय घडला?

६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:३० वाजेपासून बीड रोडवरील शासकीय दूध डेअरी परिसरापासून नगरपरिषदेने अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेस धडाक्यात सुरुवात केली होती. दुपारी १:३० च्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथक ‘आष्टेकर स्नॅक्स’ जवळ पोहोचले. पथकाने हॉटेलसमोरील बेकायदेशीर बांधकाम हटवण्यास सुरुवात करताच, हॉटेलचालक विजय आष्टेकर व त्यांच्या पत्नीने थेट इमारतीच्या स्लॅबवरून कर्मचाऱ्यांच्या अंगावर तुफान दगडफेक सुरू केली.

दगडफेकीच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली व पळापळ झाली.

कर्मचारी जखमी व मारहाण

या अचानक झालेल्या दगडफेकीत नगरपरिषद कर्मचारी संभाजी अजिनाथ डोके (वय ३०, रा. भुतवडा) यांच्या पाठीवर व उजव्या मांडीवर दगड लागून ते गंभीर दुखापतग्रस्त झाले, तर ब्रेकर ऑपरेटर तुषार अशोक शेळके यांच्या हाताला दगड लागल्याने ते जखमी झाले.

दगडफेकीनंतर आरोपी दत्तात्रय आष्टेकर याने पुढे येत संभाजी डोके यांची गचांडी धरून त्यांना लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली आणि खाली पाडले. “जर तुम्ही आमच्या हॉटेलचे अतिक्रमण काढले, तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही!” अशी थेट जीवे मारण्याची धमकीही यावेळी देण्यात आली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत डोके यांची आरोपींच्या तावडीतून सुटका केली.

रुग्णालयात उपचार आणि पोलीस कारवाई

हल्ल्यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांवर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या घटनेनंतर नगरपरिषदेचे कर्मचारी संभाजी डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात खालील तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे:

  1. विजय आष्टेकर (रा. बीड रोड, जामखेड)
  2. विजय आष्टेकर यांची पत्नी
  3. दत्तात्रय आष्टेकर (रा. बीड रोड, जामखेड)

भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, १२१(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे व धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार एस. डी. लोखंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment