जामखेड: जामखेड तालुक्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस अधिकच भीषण आणि जीवघेणी होत चालली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने व पाण्याचे स्रोत आटल्यामुळे विहिरींनी पुरता तळ गाठला आहे. परिणामी, दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना आपला जीव धोक्यात घालून विहिरीच्या तळाशी उतरावे लागत आहे. अशातच आनंदवाडी येथे विहिरीच्या तळाशी गेलेले पाणी उपसण्यासाठी गेलेल्या एका ४८ वर्षीय शेतकऱ्याचा अचानक पाय घसरून खोल विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बबन बन्सी गीते (वय ४८, रा. आनंदवाडी, ता. जामखेड) असे या घटनेत प्राण गमावलेल्या शेतकऱ्याचे नाव असून या दुर्दैवी घटनेमुळे आनंदवाडीसह संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व शोककळा पसरली आहे.
आनंदवाडी परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गुरुवारी सकाळी बबन गीते हे घरातील दैनंदिन वापरासाठी पाणी आणण्यासाठी स्थानिक विहिरीवर गेले होते. विहिरीच्या अगदी तळाशी उरलेले पाणी उपसण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते थेट खोल विहिरीत कोसळले. विहिरीतील खडकांवर आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने विहिरीकडे धाव घेऊन त्यांना बाहेर काढले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण तालुक्यातून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. जामखेड तालुक्यात दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न अक्राळविक्राळ रूप धारण करत असून हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना थेट विहिरीच्या तळाशी उतरावे लागत असल्याचे या घटनेवरून उघड झाले आहे. गावात भीषण पाणीटंचाई असतानाही प्रशासनाकडून वेळेवर उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल उपस्थित करत आनंदवाडी व परिसरात कसलाही विलंब न करता प्रशासनाने तात्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.









