अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC Bank) पंचवार्षिक निवडणुकीतून महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी माघार घेतल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अंतरात्मा आणि घटनात्मक पदाची प्रतिष्ठा जपत अर्ज न भरल्याचा दावा राम शिंदे यांनी केला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी यावरून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
“तीन अपत्यांची बाब समोर आणल्यानेच राम शिंदेंना माघार घ्यावी लागली आणि आता ते प्रामाणिकपणाचा आव आणत आहेत,” अशी घणाघाती टीका रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे.
“तीन अपत्यांचा मुद्दा समोर आणताच साक्षात्कार झाला” – रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे:
“विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आधी अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा गाजावाजा करुन अर्ज भरला, पण त्यांना तीन अपत्ये असल्याची बाब आम्ही समोर आणताच त्यांना अचानक पदाची अप्रतिष्ठा होऊ नये असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी माघार घेतली. आधीच नियमांचा आदर केला असता तर आज अर्ज माघारी घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आली नसती आणि संविधानिक पदाचीही अप्रतिष्ठा झाली नसती. आता चोरी पकडली गेल्यानंतर प्रामाणिकपणाचा आव आणण्याचा हा प्रकार आहे.. दुसरं काय…!”
राम शिंदे माघार घेताना काय म्हणाले?
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राम शिंदे यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.व्यक्तिगत महत्त्वकांक्षांपेक्षा कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं राम शिंदे यांनी जाहीर केलं आहे. बँकेच्या निवडणुकीतून माघार घेत असलो तरी कुठल्याही राजकीय दबावातून हा निर्णय घेतलेला नसून आपल्या विवेक बुद्धीने घेतलेला निर्णय आहे, असं राम शिंदे यांनी म्हटलं.
दरम्यान, रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर 1 ऑक्टोबरला देखील टीका केली होती. तीन अपत्ये असूनही विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. विधानपरिषदेसारख्या कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतींनाच कायदे-नियम माहित नसतील तर याला काय बोलावं? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला होता.
राजकीय वादाला नवे वळण
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी प्रा. राम शिंदे यांनी घटनात्मक पदाची गरिमा जपण्यासाठी माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, रोहित पवार यांनी थेट नियमावलीचा आणि अपत्यांचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे या राजकीय नाट्याला मोठे वळण मिळाले आहे.
रोहित पवारांच्या या दाव्यानंतर आता अहिल्यानगरमधील सहकार क्षेत्रातील आणि भाजप-राष्ट्रवादीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.









