जिल्हा बँक निवडणूक: राम शिंदेंचा उमेदवारी अर्ज; बिनविरोधच्या चर्चेतच विखे-पाटील पिता-पुत्रांवर शाब्दिक ‘गुगली’!

Spread the love

संगमनेरच्या बैठकीवरून महायुतीत विसंवाद समोर; पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत शिंदेंचा अर्ज भरण्याचा निर्धार

जामखेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेर येथे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली असली, तरी बँकेच्या राजकारणातील तापमान भलतेच वाढले आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज नेला असून, संगमनेरमधील बैठकीवर आणि महायुतीतील विसंवादावर जोरदार भाष्य केले आहे. “कर्जत-जामखेड या दोन्ही तालुक्यांतून माझ्या नावाचा ठराव झाला असून मी तेथील मतदार आहे. कायदेशीर अडचणी व तांत्रिक बाबी तपासून मी अर्ज भरणारच,” असा थेट इशारा राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

बिनविरोधच्या गप्पा, पण ५०० हून अधिक अर्ज वितरीत!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध व्हावी असा सूर बैठकीत उमटला होता. मात्र, सभासदांचा सूर वेगळाच असल्याचे चित्र आहे. केवळ दोनच दिवसांत तब्बल ५४१ अर्जांची विक्री झाली आहे. एका जागेसाठी किंवा पॅनेलसाठी २१ अर्ज याप्रमाणे तब्बल २६ पॅनेल तयार होऊ शकतात, अशी सध्याची परिस्थिती असल्याचे सांगत शिंदेंनी बिनविरोधच्या दाव्यांमधील हवा काढून घेतली.

पालकमंत्री अनभिज्ञ; विखे पिता-पुत्रांमध्येच एकवाक्यता नाही?

संगमनेरमधील बैठकीबाबत बोलताना राम शिंदे यांनी महायुतीतील विसंवादावर बोट ठेवले. “बिनविरोधसाठी संगमनेरमध्ये बैठक झाली, पण जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाच या बैठकीची कोणतीही कल्पना नव्हती. ते या बैठकीनंतर जिल्ह्यात उपस्थितही नाहीत. मग विखे यांना विचारात घेतले गेले की नाही, याबाबत अस्पष्टता आहे,” असे सांगत शिंदेंनी शाब्दिक गुगली टाकली.

विशेष म्हणजे, संगमनेरच्या बैठकीला भाजपचे खासदार सुजय विखे पाटील उपस्थित होते, तर दुसरीकडे पालकमंत्री विखे यांना माहिती नाही. “त्यामुळे या पिता-पुत्रांमध्येच अनभिज्ञता असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पालकमंत्र्यांनीच आता समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे,” असा टोलाही त्यांनी लगावला.

थोरात, गडाख, कोल्हेंचा संपर्क; पण पुढे काय?

“संगमनेरमधील बैठकीनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख आणि विवेक कोल्हे यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. मात्र, त्या प्राथमिक संपर्कानंतर माझ्याशी कोणतीही पुढील चर्चा झाली नाही,” असा खुलासा शिंदेंनी केला.

महायुतीत नाराजी; ‘सभापती’ म्हणून हस्तक्षेप करावा लागणार?

पालकमंत्री बैठकीबाबत अनभिज्ञ आहेत, तर दुसरीकडे शिवसेनाही या प्रक्रियेवर नाराज असून वेगळी बैठक घेत असल्याचे समोर येत आहे. “नेत्यांच्या बोलण्यात आणि भूमिकेत एकवाक्यता नसल्यानेच सभासदांनी अर्ज नेण्यास सुरुवात केली आहे. महायुतीत आणि नेत्यांमध्ये ही परिस्थिती असेल तर विधान परिषदेचा सभापती म्हणून मलाच यात काही भूमिका घ्यावी लागते की काय, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे,” असे सूचक वक्तव्य प्रा. राम शिंदे यांनी शेवटी केले.

Leave a Comment