जवळा-हळगाव रस्त्यावरील दूध डेअरीसमोर धक्कादायक प्रकार; दीड तोळ्याचे सोन्याचे गंठन हिसकावून दोघे जामखेडच्या दिशेने पसार
जामखेड : सायंकाळी मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या ५९ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठन दुचाकीवरून आलेल्या दोन मास्कधारी चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना जवळा-हळगाव रस्त्यावरील कॉर्नरवर असलेल्या दूध डेअरीसमोर घडली. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जवळा येथील शकुंतला मारुती हजारे (वय ५९) या त्यांची मैत्रीण लता किसन राऊत यांच्यासोबत दररोज सायंकाळी जवळा ते हळगाव रस्त्यावर फिरण्यासाठी जातात. रविवारी (दि. १६) सायंकाळी सहाच्या सुमारास दोघी नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर पडल्या. अमोल डेअरीसमोर आल्यानंतर त्यांच्या पाठीमागून एक दुचाकी आली.
दुचाकीवर दोन अनोळखी व्यक्ती होते. दोघांनीही चेहऱ्यावर काळे मास्क लावले होते. दुचाकी त्यांच्या जवळ थांबताच मागे बसलेल्या व्यक्तीने हजारे यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठन जोराने ओढले. हजारे यांनी प्रतिकार करत त्याच्या हातावर मारले. त्यामुळे गंठन खाली पडले. मात्र, चोरट्याने तत्काळ खाली पडलेले गंठन उचलले आणि साथीदारासह दुचाकीवरून जामखेडच्या दिशेने पोबारा केला.
चोरीस गेलेल्या गंठनाचे वजन सुमारे दीड तोळे असून त्याची किंमत ३० हजार रुपये असल्याचे पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर शकुंतला हजारे यांनी जामखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी अज्ञात दुचाकीस्वारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४(१) व ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार तुकाराम बाबन सोनवणे पुढील तपास करीत आहेत.








